एखादी विशिष्ट थीम ठरवून कॅफे आणि रेस्टॉरंटस सुरू करण्याचे गेल्या काही वर्षांपासून चांगलेच फॅड सुरु आहे. परंतु, आपण एखाद्या ठिकाणी गेलो आणि तेथील कर्मचाऱ्यांनी आपण ऑर्डर दिलेल्या पदार्थांपेक्षा भलताच कोणतातरी पदार्थ आणून दिला तर, एखादी व्यक्ती किती तमाशा करू शकतो, हे आपण टीव्हीवरील बातम्यांवरून म्हणा किंवा सध्याच्या सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे पाहत असतो. परंतु, जपानमधील टोकियो येथे एका विशिष्ट थीम असणाऱ्या या एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. यांच्या थीमनुसार या रेस्टॉरंटचे नावदेखील फारच मस्त आणि वेगळे आहे.
जर तुम्ही टोकियोमधील ‘रेस्टॉरंट ऑफ मिस्टेकन ऑर्डर्स’ या कॅफेमध्ये एखाद्या पदार्थाची ऑर्डर दिली आणि त्याऐवजी भलताच कुठला पदार्थ समोर आला तर कोणतीही व्यक्ती त्याबद्दल अजिबात तक्रार करत नाहीत. अरेच्चा, पण असं का बरं? हा प्रश्न पडला असेल तर याचे कारण विशेष आहे.
हेही वाचा : अरेच्चा! बूट आहेत की पाय? Louis Vuitton च्या ‘इल्युजन हाय बूट्स’ची किंमत बघून व्हाल थक्क!
या रेस्टॉरंटमध्ये डिमेन्शिया हा आजार असणारी मंडळी काम करत आहेत. डिमेन्शिया म्हणजे, स्मृतिभ्रंश. लोकांना डिमेन्शिया/स्मृतिभ्रंश या आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी खरंतर या रेस्टॉरंटची सुरुवात झाली आहे. २०२५ या वर्षापर्यंत जपानमध्ये, पाच व्यक्तींमध्ये एका व्यक्तीला स्मृतिभ्रंश हा आजार होण्याची संभावना वर्तविली जाते, असे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.
“कधी कधी रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बसायला जागा दाखवणारी वृद्ध महिला त्यांच्यासोबतच त्या टेबलवर बसून राहते. काही वेळेस एखादा वेटर गरम कॉफीमध्ये स्ट्रॉ घालून देतो. परंतु, या लहान लहान गोष्टींचा कोणीही त्रागा करत नाही. त्यामुळे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात “मी काहीतरी चांगले केले आहे”, “मी अजूनही काहीतरी करू शकतो”, अशी भावना निर्माण होते.
या रेस्टॉरंटचे संस्थापक शिरो उनी [Shiro Oguni] यांनी २०१७ मध्ये हा उपक्रम सुरू केला होता. त्यांना ही कल्पना त्यांच्या इथे राहणाऱ्या आणि स्मृतिभ्रंश असणाऱ्या काही मंडळींकडून मिळाली. “सुरुवातीला डिमेन्शिया/ स्मृतिभ्रंश अशी व्यक्ती म्हणजे सतत विसरणारी किंवा काहीतरी शोधात असणारी व्यक्ती असे नकारात्मक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहायचे. पण, खरंतर ते इतर कोणत्याही सामान्य व्यक्तींप्रमाणे जेवण बनवणे, साफसफाई करणे, खरेदीला जाणे यांसारख्या सर्व गोष्टी करू शकतात; हे मला हळूहळू समजले. अर्थातच, कधीतरी ते थोडे विसरल्यासारखे किंवा थोडे वेगळे वागतात. परंतु…” असे शिरो उनी यांनी ‘द गव्हर्मेंट ऑफ जपान’ या वेबसाईटला माहिती देताना सांगितले.