Noida Viral Video : लहानपणी शाळेत विद्यार्थांना जागेवर उभे राहण्याची शिक्षा दिली जात असे. आता एखाद्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामात दिरंगाई केल्याने ही शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. एका वयस्कर व्यक्तीला उशीरपर्यंत वाट पाहायला लावल्याबद्दल १६ कर्मचाऱ्यांना त्यांच्या जागेवर २० मिनिटं उभे राहण्याची शिक्षा दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना नोएडाच्या रेसिडेंशियल प्लॉट विभागात घडली असून आयएएस अधिकार्याने एका ज्येष्ठ व्यक्तीकडे वेळेत लक्ष न दिल्याने कर्मचार्यांना ही शिक्षा दिली आहे.
प्रशासकीय अधिकारी डॉ लोकेश एम यांनी सोमवारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एका वृद्ध व्यक्तीला जवळपास तासभर वाट पाहायला लावल्याचे आढळून आले. या कर्मचाऱ्यांनी प्राधान्याने या वृद्ध व्यक्तीकडे लक्ष न दिल्याची चूक कर्मचार्यांच्या लक्षात राहावी म्हणून या सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना उभे राहण्याची शिक्षा देण्यात आली.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, न्यू ओखला औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात कामकाज सुरळीत सुरू आहे की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी जवळपास ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते.
नोएडा प्राधिकरणाचे सीईओ डॉ. एम लोकेश एम यांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेड पाहिले तेव्हा त्यांना एका काउंटरवर एक ज्येष्ठ व्यक्ती बराच वेळ वाट पाहत उभी असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ कार्यालयात जाऊन या व्यक्तीच्या कामासंबंधी विचारणा केली. तसेच तेथे बसलेल्या महिला कर्मचाऱ्यांना त्या व्यक्तीची दखल घेण्यास सांगण्यात आले.
लोकेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कर्मचारी त्या व्यक्तीच्या मालमत्तेसंबंधीच्या तक्रारी सोडवत नसल्याचा आणि त्यांना जवळपास एक तासभर उभे राहायला लावल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, “मला सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्षात आले की कार्यालयात आलेल्यांची चौकशी करण्याची तसदीही न घेता आमचा एक कर्मचारी निवांत बसलेला होता…नंतर मी या विभागाला भेट दिली आणि कार्यालयात येणाऱ्या लोकांचे प्रश्न ऐकून घेताना सर्व कर्मचार्यांना २० मिनिटे उभे राहण्याचे निर्देश दिले”.