२००७ पासून प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते, तो क्षण समोर येण्यासाठी १७ वर्षं लागली. भारतीय संघानं २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलंय. २९ जून रोजी झालेल्या या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत भारताने तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं. या विजयानंतर भारतीय संघ ४ जुलै रोजी भारतात परतला. टी-२० विश्वचषक जिंकून तब्बल चार दिवसांनंतर मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचं गुरुवारी दिमाखात स्वागत झालं.
विजयाच्या जल्लोषासाठी भारतीय संघ गुरुवारी मुंबईला पोहोचला. मुंबईत लाखो चाहते लाडक्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील रस्ते चाहत्यांच्या तुडुंब गर्दीने भरलेले होते. मरीन ड्राईव्हवर तर एकीकडे अरबी समुद्र आणि दुसरीकडे चाहत्यांचा समुद्र अवतरल्याचं पाहायला मिळालं. भारतीय संघाच्या गौरवासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं वानखेडे स्टेडियवर विशेष कार्यक्रमही आयोजित केला होता.
संध्याकाळी उशिरा मरीन ड्राइव्हवरील क्वीन ऑफ नेकलेस येथे भारतीय संघाच्या विजयी मिरवणूकीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वांनीच त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यात आनंद महिंद्राही मागे राहिले नाहीत. त्यांनीही एक खास फोटो पोस्ट करीत एक अप्रतिम कॅप्शन दिले आहे.
(हे ही वाचा : Video: प्रशासनाचा निष्काळजीपणा! घरासमोरच खोदली ‘मृत्यूची विहीर’, आईबरोबर घरी जाताना मुलगी पडली खड्ड्यात अन्… )
आनंद महिंद्रा हे त्यांच्या खेळाच्या आवडीसाठीही ओळखले जातात. भारताच्या टी-२० विश्वचषकाच्या संपूर्ण प्रवासात, ते सोशल मीडियावर टीम मॅच बाय मॅचचा जयजयकार करीत राहिले. आता यावेळी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या विजयी मिरवणूकीचा फोटो शेअर करून मरीन ड्राइव्हवर एक सुंदर कमेंट केली आहे.
आनंद महिंद्रांनी कोणती पोस्ट शेअर केली?
आनंद महिंद्रा म्हणाले, “मुंबईतील मरीन ड्राईव्हनं आपली ओळख ‘क्वीन ऑफ नेकलेस’ अशी निर्माण केली होती; पण आता हे ठिकाण मुंबईतील ‘जादू की झप्पी’ या नावानं ओळखलं जाणार”, असं त्यांनी नमूद केलं.
येथे पाहा पोस्ट
सोशल मीडियावरही लोक आपापल्या शैलीत भारताचा हा विजय साजरा करीत आहेत. आनंद महिंद्रा यांच्या पोस्टवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, “भारतात क्रिकेट ही खरी भावना आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलं की, “लोकांचा हा महापूर खरोखरच जादुई आहे.” महिंद्राच्या या पोस्टला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्युज आणि सुमारे ५४ हजार लाइक्स मिळाले आहेत.
सूर्यकुमार यादवकडून आनंद महिंद्रांच्या पोस्टचे कौतुक
आता आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, लोक त्यावर आपल्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वांत महत्त्वाचा झेल घेणाऱ्या सूर्यकुमारनंही त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. महिंद्राची पोस्ट री-शेअर करताना त्यानं लिहिलं, व्वा! तुम्ही काय म्हणाले सर…!