सध्या पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका अनोख्या आणि धक्कादायक घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. ती म्हणजे येथील एका व्यक्तीच्या मृतदेहाला अग्नी देताच चितेतून ५०० रुपयांच्या नोटा उडू लागल्या. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. चितेतून बाहेर येणाऱ्या नोटा पाहून उपस्थित लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. काही लोकांनी लगेच चितेवर पाणी ओतून आग विझवली. पण या चितेतून नोटा कशा बाहेर आल्या याबाबतची माहिती जाणून घेऊ.
मिळालेल्या माहितीनुसार, परगणा जिल्ह्यातील बशीरहाट येथे राहणाऱ्या निमाई सरदार यांचे मागील रविवारी निधन झाले. निमाई हे व्हॅन चालवून स्वत:चा उदरनिर्वाह करायचे शिवाय त्यांना काही मुलबाळ नव्हते. त्यामुळे त्याचे निधन झाल्यानंतर त्यांना पुतण्या पंचानन सरदार याने निमाई यांच्या चितेला अग्नी दिला. मात्र चितेला अग्नी देताच चितेतून ५०० रुपयांच्या नोटा हवेत उडू लागल्या.
हेही पाहा- फेमस होण्यासाठी कायपण! व्ह्युज आणि लाईक मिळवण्यासाठी केला लोकांवर हल्ला, VIDEO पाहून संतापले नेटकरी
उशी आणि गादीमध्ये लपवले होते पैसे –
तर सांगितलं जात आहे की, निमाई हे गाडी चालवून कमावलेले पैसे उशी आणि गादीमध्ये लपवून ठेवायचे. अंत्यसंस्कार करताना लोकांनी त्यांची उशी आणि गादी देखील चितेवर ठेवली होती. त्यामुळे चितेला अग्नी देताच गादी आणि उशीला आग लागली त्यामुळे आतील पैसे आगीच्या धुरात उडू लागले. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. लोकांनी चितेवर पाणी टाकून आग विझवली आणि उशी आणि गादीतील नोटा जळण्यापासून वाचवल्या. पुतण्या पंचानन सरदार याने सांगितले की, उशीच्या आत एक छोटी पिशवी होती. ज्यामध्ये काकांनी पैसे लपवले होते. पिशवीत प्रत्येकी ५०० रुपयांचे बंडल भरले होते. त्यापैकी १६ हजारांच्या नोटा जळाल्या होत्या या जळलेल्या नोटा बदलून त्याला ७,१५० रुपये मिळाले असल्याचंही त्याने सांगितले. सध्या या घटनेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.