पेट लव्हर्स म्हणजेच प्राण्यांवर प्रेम करणारे काहीजणांचं प्रेम इतकं असतं की यासमोर पैसा आणि इतर गोष्टी त्यांना फार महत्वाच्या वाटत नाहीत. असच काहीसं घडलं ब्रिटनमधील नॉर्टिंगहममध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत या जोडप्याने आपल्या लाडक्या कुत्र्याच्या वाढदिवसाची पार्टी केली. आता तुम्ही म्हणाल कुत्र्याच्या वाढदिवसाची पार्टी केली तर त्यात एवढं काय विशेष. तर या पार्टीमागील विशेष गोष्ट ही होती की या पार्टीसाठी या दोघांनी तब्बल तीन लाख रुपये खर्च केले.

लॉरेन बाल्के आणि तिचा पार्टन केरन यांनी त्यांच्या इंग्लीश बुलडॉगच्या वाढदिवसावर एवढे पैसे खर्च केलेत. त्यांनी आपल्या डेव्ह नावाच्या कुत्र्याचा नववा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. या दोघांनी एवढा पैसा खर्च केला की अनेकांना यासंदर्भात आश्चर्य वाटत आहे. डेव्हच्या वाढदिवसासाठी अगदी केकपासून तर पार्टीसहीत सर्व गोष्टींचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी लॉकडाउनमुळे त्यांना डव्हचा आठवा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यामुळेच त्यांनी यंदा मागील वर्षीचीही कसर भरुन काढत एकदम दण्यात वाढदिवस साजरा केला असं नॉर्टिंगहम पोस्टने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

या कुत्र्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीमधील केक हा खास आकर्षणाचा विषय ठरला. हा केक बनवण्यासाठी या दोघांनी लारा मॅसन नावाच्या केक बनवणाऱ्या महिलेला टीकटॉकवरुन संपर्क केला होता. जेव्हा मला केकची ऑर्डर मिळाली तेव्हा मलाच आश्चर्याचा धक्का बसला असं लारा यांनी सांगितलं. यापूर्वी लाराला एवढ्या मोठ्या आकाराच्या केकची ऑर्डर कधी मिळाली नव्हती. केक म्हणून या दांपत्याला त्यांच्या कुत्र्याच्या आकाराचाच आणि तसाच दिसणारा केक हवा होता. हा खास केक बनवण्यासाठी ८० अंडी, अडीच किलो बटर, अडीच किलो साखर, अडीच किलो पीठ आणि तीन किलो क्रीम तसेच ५ किलो चॉकलेट वापरण्यात आलं.

डेव्हच्या वाढदिवसानिमित्त खास शीप म्हणजेच जहाज या थीमवर आधारित पार्टी आयोजित करण्यात आली होती. डेव्ह हा या जहाजाचा कॅप्टन होता. वाढदिवसाच्या या पार्टीतील प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी एक व्हिडीओग्राफरही बोलवण्यात आला होता. नंतर पार्टीमधील हे फुटेज म्यूझिक व्हिडीओसोबत एडीट करुन जेवणाच्या वेळेला हॉलमध्ये मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं. या खास दिवशी एक छोटी बोटही भाड्याने घेण्यात आली होती. वाढदिवसानिमित्त आमंत्रित पाहुणे आणि त्यांच्या कुत्र्यांसाठी खास पूल पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये केक स्मॅश फोटोशूटही करण्यात आलं.

विशेष म्हणजे डेव्ह हा सोशल नेटवर्किंगवरही लोकप्रिय असून त्याचं एका इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. @dave_living_his_best_life नावाने हे अकाऊंट असून एक हजार लोकं हे पेज फॉलो करतात. या पेजवर या कुत्र्याच्या आयुष्यातील दैनंदिन घटनासंदर्भातील फोटो हे दांपत्य पोस्ट करत असतं. डेव्हच्या दहाव्या वाढदिवसाला त्याला युरोपमध्ये फिरायला घेऊन जाण्याचा या दोघांचा विचार आहे.

Story img Loader