भारताला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे झाली. मात्र अद्यापही अनेक गाव-पाड्यांमध्ये वीज पोहोचलेली नाही. वीजेच्या तुटवड्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे. वीजनिर्मितीसाठी सातत्याने अनेक प्रयोगही केले जात आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जात आहे. असाच एक प्रयोग नुकताच करण्यात आला असून, टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मिती होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे. रद्दी टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मितीचा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो भारतासाठीही एक नवा आशेचा किरण असेल, असे म्हटले जात आहे.
Video : मेलानियाशी हस्तांदोलन डोनाल्ड ट्रम्प यांना पडले महागात
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम युरोपमधील अॅमस्टरडॅम विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केला आहे. दोन पायांच्या साह्याने चालवता येणाऱ्या यंत्राच्या माध्यमातून रद्दी टॉयलेट पेपरपासून वीजनिर्मिती होऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. यासाठी येणारा खर्चही तुलनेत खूपच कमी आहे. घराच्या छतावर लावण्यात येणाऱ्या सौर पॅनलइतकाच खर्च येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. टॉयलेट पेपर हा कार्बनचा एक चांगला स्त्रोत ठरू शकतो. रद्दी टॉयलेट पेपरपासून वीज निर्मिती हा एक प्रचलित वीजनिर्मितीच्या पद्धतीला मोठा पर्याय ठरू शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. युरोपमध्ये एक व्यक्ती एका वर्षाला १० ते १४ किलो पेपर वापरतो. याबाबतचे संशोधन पूर्ण झाले असून लवकरच अशा प्रकारे वीजनिर्मिती करता येऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.