स्पेन या देशात ५ जानेवारीला एक नवीन कायदा लागू करण्यात आला असून या कायद्यानुसार आता या देशातील पाळीव प्राण्यांना फक्त एक प्राणी म्हणून नाही तर घरातील सदस्य म्हणून वागवले जाईल. याचाच अर्थ असा की यापुढे घटस्फोट घेताना किंवा विभक्त होताना कौटुंबिक गरज लक्षात घेण्याबरोबरच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी कोण घेणार हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरणार आहे. या मुद्द्यावर कौटुंबिक न्यायालयात चर्चा केली जाईल. हा कायदा लागू करणारे स्पेन हे पहिलेच राष्ट्र नाही. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि पोर्तुगाल हे काही इतर युरोपीय राष्ट्र आहेत ज्यांनी पाळीव प्राण्यांना संवेदनशील प्राणी म्हणून दर्जा दिला आहे.
स्पेनमध्ये युनिदस पोडिमोस या आघाडी सरकारमधील कनिष्ठ सदस्याने कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्यांनी ऑक्टोबरपासून प्राणी कल्याण कायद्याचा मसुदा तयार केला आहे. घरातील पाळीव प्राण्यांची देखभाल कोण करणार यावरून विभक्त होणाऱ्या जोडप्यांमध्ये कायदेशीर लढा होण्याची शक्यता टाळण्याच्या उद्देशाने हा कायदा तयात करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. या कायद्यानुसार मालकाने पाळीव प्राण्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची हमी द्यायला हवी. जर संबंधित जोडप्यामधील एका व्यक्तीचा प्राण्यांवर अत्याचार करण्याचा इतिहास असेल तर अशा व्यक्तीला प्राण्याचा ताबा नाकारला जाऊ शकतो.
हेही वाचा : पोलिसाचा चोराला ‘सिंघम स्टाईल’ दणका; सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
एल पैसने नोंदवल्यानुसार, स्पॅनिश कायद्यानुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. नागरी संहिता, तारण कायदा आणि नागरी प्रक्रिया कायदा, कायद्याच्या या तीन तुकड्यांमध्ये हे फेरबदल केले जातील. रॉयटर्सने माहिती दिल्याप्रमाणे, ४२ वर्षीय वकील लोला गार्सिया म्हणाल्या आहेत, “प्राणी हे कुटुंबाचा एक भाग आहेत आणि जेव्हा एखादे कुटुंब वेगळे होण्याचा निर्णय घेत असते तेव्हा त्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच प्राण्यांचे भवितव्य सुनिश्चित करणे गरजेचे आहे.”
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्पेनच्या नागरी संहितेत सुधारणा करणाऱ्या या कायद्यानुसार, पाळीव प्राण्याचा ताबा कोणाला देण्यात यावा हे ठरवताना न्यायालयांनी प्राण्याच्या कल्याणाचा विचार करणे आवश्यक आहे.