मुळच्या वसईकर पण आता दुबईत स्थायिक असलेल्या सुप्रिया फर्नांडिस यांनी दुबईमध्ये ‘वसईलोकल’ हे अस्सल कोळी पद्धतीचं जेवण देणारं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. 20 एप्रिल रोजी या रेस्टॉरंटचं उद्धाटन झालं असून पहिल्या दिवसापासून मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढवणारा असल्याचं फर्नांडिस यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पर्यटन क्षेत्रामध्ये अनेक वर्ष नोकरी केल्यावर सुप्रिया यांनी आपल्या मुलाकडे लक्ष देता यावं, कुटुंबाला वेळ देता यावा यासाठी नोकरी सोडली व दोन वर्षांची उसंत घेतली. या काळात स्वस्थ बसायची सवय नसलेल्या सुप्रियांनी ग्रॅनोला बनवायला सुरूवात केली. त्यांच्या हाताला असलेली चव आणि स्वयंपाकची आवड यामुळे ग्रॅनोला आणखी चवदार बनत असे. त्यांच्या हातचे ग्रॅनोला खाण्यासाठी खवयांची गर्दी दिवसेनदिवस वाढू लागली होती. ग्रॅनोलासाठीही त्यांना 300 ते 500 किलोची ऑर्डर यायला लागली. “यावेळी मला वाटलं की आता दोन वर्ष उसंत घेतली आहे, कुटुंबाला वेळ दिला आहे तर आता खाण्यापिण्याच्या क्षेत्रामध्येच करीअर का करू नये. दुबई हे फूड हब आहे. जगातलं सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ इथं मिळतात आणि पाच डिरहॅमपासून ते पाच हजार डिरहॅम इतक्या वैविध्यामध्ये इथं खाणं पिणं उपलब्ध आहे. त्यामुळे जर दर्जा राखला तर नक्कीच यश मिळेल असा विश्वास आला,” सुप्रिया सांगतात.

“आता या क्षेत्रामध्ये करीअर करायचं ठरवल्यावर माझ्या मनात आलं की आपण आपलंच कोळी कल्चर का इथं आणू नये. त्यातूनच मग भारताबाहेरचं जगातलं पहिलं कोळी रेस्टॉरंट करण्याचं ठरलं. आणि ते कल्चर जसंच्या तसं आणण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले. सुका बोंबिल, जवळा, सोलकढी असे खास आपल्याकडचे पदार्थ आम्ही देतो. वसई, आगाशे या भागामध्ये मिळणारी सर्वोत्कृष्ट सुकी मासळी आम्ही मागवतो. माझ्या मावशीनं बनवलेले मसाले वापरले जातात. आपल्या भाषेत पण इंग्रजी लिपीत मेनुकार्डवर आम्ही पदार्थ लिहिलेले आहेत. सुका बोंबिल, जवळा आदींची माहिती पण आम्ही ग्राहकांना देतो,” त्यामुळे आपलं कल्चर काय आहे हे ग्राहकांना कळतं असं सुप्रियांनी सांगितलं. कोळी संस्कृतीचा परीचय रेस्टॉरंटमध्ये आल्या आल्या व्हावा यासाठी मुंबई, वसईचे नकाशे वापरले, भारतातून टोपल्या, मासे पकडायची जाळी आदीचा वापर डेकोरेशनमध्ये केला असं त्या म्हणाल्या.

या रेस्टॉरंटचं उद्घाटनही झालं असून खास वसईच्या रीतीरिवाजानं ते करण्यात आलं. कोळीवेषामधल्या यजमानांनी ‘मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी’ या गाण्यावर खास कोळीडान्स करत दुबईच्या अल करामामध्ये नवा अध्याय सुरू केला आहे.

‘मी हाय कोली सोरिल्या डोली न मुंबईच्या किनारी’ या गाण्यावर खास कोळीडान्स करत वसईलोकल रेस्टॉरंटचं उद्घाटन करण्यात आलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now vasai mumbais koli foof culture in dubai