Nvidia vs DeepSeek : एक आठवड्यापूर्वी लाँच झालेल्या चीनच्या एआय टूल डीपसीकची बरीच चर्चा चालू आहे. चीनचे एआयच्या जगात पाऊल चॅटजीपीटी आणि जेमिनीसारख्या मोठ्या कंपन्यांना टक्कर देत आहे. तसेच हे गूगल स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं ॲप ठरलं आहे. डीपसीक हा Hangzhou बेस्ड टेक कंपनीने लाँच केलेला AI चॅटबॉट आहे. या एआय चॅटबॉट बनवणारे, डीपसीकसाठी व Hangzhou कंपनीत काम करणाऱ्यांचीही समाजमाध्यमांवर बरीच चर्चा आहे. अलीकडेच एनव्हीडिया कंपनी सोडून डीपसीकमध्ये रुजू झालेल्या एका तरुणाचं एनव्हीडियामध्ये काम करणाऱ्या एका शास्त्रज्ञाने कौतुक केलं आहे. हा तरुण एनव्हीडियामध्ये पूर्वी इंटर्न म्हणून काम करत होता. या तरुणाचं नाव झीझेंग पॅन (Zizheng Pan) असं आहे. एनव्हीडियाचे प्रमुख संशोधन शास्त्रज्ञ झिडिंग यू यांनी झीझेंगचं कौतुक करणारी एक पोस्ट एक्सवर केली आहे.

डीपसीक लाँच झाल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात अक्षरश: उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. एनव्हीडियाच्या शेअर्सनं गेल्या चार महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे कंपनीचं तब्बल ६०० बिलियन डॉलर्सचं नुकसान झालं. त्यामुळे अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा वरचष्मा असणाऱ्या नॅसडॅक शेअर बाजारात तीन टक्क्यांहून मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर झिडिंग यू यांनी झीझेंगसाठी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की झीझेंग पॅन २०२३ मध्ये एनव्हीडियामध्ये रीसर्च इंटर्न म्हणून रुजू झाला. त्यानंतर त्याने डीपसीकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एनव्हीडिया कंपनी त्याला पूर्णवेळ नोकरी देण्याच्या विचारात होती. मात्र पॅनने डीपसीकचीच निवड केली. झीझेंगने हा निर्णय घेतला तेव्हा डीपसीकमध्ये केवळ तीनच सदस्य होते. तरीदेखील त्याने या स्टार्टअप कंपनीची निवड केली आणि आता ही स्टार्टअप कंपनी जगभरात गाजतेय.

झिडिंग यू यांची झीझेंग पॅनसाठी खास पोस्ट

झिडिंग यू यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “मी झीझेंगच्या निर्णयाने मी खूप प्रभावित झालो आहे. झीझेंग २०२३ मध्ये एनव्हीडियामध्ये एक इंटर्न होता. आम्ही त्याला पूर्णवेळ नोकरी देण्याचा विचार करत होतो. मात्र, त्याने कुठलाही विचार न करता डीपसीकमध्ये जाण्याचा निर्णय आम्हाला सांगितला. डीपसीक या मल्टीमॉडेल टीममध्ये तेव्हा केवळ तीनच सदस्य होते. तरीदेखील झीझेंग त्याच्या निर्णयावर ठाम होता. पॅनच्या या निर्णयाने मी तेव्हा प्रभावित झालो होतो आणि आताही मी तितकाच प्रभावित आहे. डीपसीक – व्हीएल २, डीपसीक – व्ही ३, डीपसीक – आर १ सह डीपसीकमध्ये अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये पॅनचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याच्या वैयक्तिक निर्णयाबद्दल आणि त्याच्या उत्तम कामगिरीबद्दल मी खूप आनंदी आहे.

Story img Loader