राष्ट्रीय उद्यान किंवा जंगल सफारीला गेल्यानंतर अनेकांना तेथील वन्य प्राण्यांबरोबर सेल्फी किंवा फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. पण ओडिशा राज्यात आता वन्य प्राण्यांबरोबर परवानगीशिवाय सेल्फी किंवा फोटो काढणाऱ्यांना दंड आणि सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF) (वन्यजीव) सुशांत नंदा यांनी यासंदर्भात विभागीय वन अधिकारी आणि सिमिलिपाल दक्षिण, उत्तर विभाग आणि नंदनकानन प्राणी उद्यानाच्या उपसंचालकांना पत्र लिहिले आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक नंदा म्हणाले की, कायद्यांचे उल्लंघन करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना अटक करण्यात येईल. त्यानंतर अशा लोकांना न्यायालयाकडे पाठवून अधिक प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
नंदा यांनी पत्रात लिहिले की, सोशल मीडियावर अनेक लोक वन्य प्राण्यांसह काढलेले सेल्फी किंवा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचे दिसून येत आहे. अशा फोटो घेण्याच्या प्रयत्नामुळे वन्य प्राण्यांचे जीवनचक्र विस्कळीत होते. तसेच वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या तरतुदींचेही उल्लंघन होत आहे. यामुळे प्राण्यांसह फोटो घेणाऱ्या व्यक्तींना कायद्यानुसार सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
याशिवाय वन्य प्राण्यांच्या विविध प्रजाती, त्यांचे मृतदेह, शरीराचे अवयव यांबरोबर सेल्फी आणि फोटो काढणे हा देखील कायद्यान्वये दंडनीय अपराध आहे, असे नंदा यांनी पत्रात म्हटले.
ज्यांना वन्य प्राण्यांचे फोटो काढायचे आहेत त्यांना वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने लागू असलेल्या कायद्यांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे, असेही नंदा यांनी निदर्शनास आणले.
पण वन्यजीवांना मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमुख ठिकाणी आणि सोशल मीडियावर हेल्पलाइन क्रमांक प्रदर्शित करण्यास सांगितले आहे.
तसेच वन अधिकाऱ्यांना लोकांमध्ये वन्यजीव प्रजातींसोबत फोटो आणि सेल्फी घेण्यास बंदी असल्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्याबाबतही सुचना दिल्या आहेत.