टॅक्सीने प्रवास करणा-या प्रवाशांकडून टॅक्सीवाल्याने जास्त भाडे आकारण्याचा प्रकार अनेकदा घडल्याचे तुम्ही ऐकले असेल, काहींना हा अनुभव प्रत्यक्षात देखील आला असेच. पण टॅक्सीवाले फार फार तर शंभर एक रुपये जास्त भाडे आकारत असेल. पण ओला या खाजगी टॅक्सी कंपनीने एका प्रवाशाला इतके मोठे बिल पाठवले की त्या बिलाच्या पैशात त्याने दुसरी एखादी कंपनी विकत घेतली असती. मुंबईतल्या एका तरूणाला एप्रिल फुलच्या दिवशी ओलाने चांगलेच फुल बनवले. न केलेल्या प्रवासासाठी ओलाने चक्क त्याला १४९ कोटींचे बील पाठवले आता एवढं बील पाहून त्याच्याच काय पण इतरांच्या पायाखालची जमीन सरकली असणार हे नक्की.

मुलुंड इथला रहिवासी असलेल्या सुशील नरसिंह याने वाकोला मार्केटला जाण्यासाठी १ एप्रिलला ओला बुक केली होती. पण चालकाला त्याचे लोकेशन काही केल्या ट्रेस होईना. शेवटी तोच चालकाचे लोकशन शोधत त्या ठिकाणी पोहोचला, पण त्याची ‘राईड’ ओलाकडून कॅन्सल झाली. बीलाची थकबाकी असल्याने त्याला सेवेचे लाभ घेता येणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले. ही थकबाकी पाहून त्यालाही घेरी आली असणार हे नक्की. ओलाने शे पाचशे नाही तर १४९, १०, ५१, ६४८ एवढ्या रुपयांचे बील त्याला पाठवलं. आता हे आकडे वाचून आपल्याला दम लागलाय तर या प्रवाश्याची काय स्थिती झाली असणार हे वेगळं सांगायला नको. सुशीलने याचा बीलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ओलाकडे तक्रार केली आहे. ओलानेही याची दखल घेत तांत्रिक अडचणीमुळे असे झाल्याने मान्य करत त्याची माफी मागीतली आहे. विशेष म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशी हा प्रकार घडल्याने सोशल मीडियावर याची जरा जास्तच चर्चा होत आहे.

अशा प्रकारे मोठं बील पाठवण्याची ओलाची ही काही पहिलच वेळ नाही. गेल्यावर्षी रतीश शेखर नावाच्या व्यक्तीला ओलाने ९ लाख १५ हजारांचे बील पाठवले होते, तो एका सरकारी प्रकल्पातर्गंत सल्लागार म्हणून काम करतो. जुबली हिल हैदराबाद ते निझामाबाद असा प्रवास ओलाने या प्रवाशाने केला. या प्रवासात तो २ तास थांबला होता. प्रवासाचे बील जवळपास पाच हजारांच्या आसपास झाले होते. पण त्यानंतर ओला या कंपनीने इतके मोठे बिल पाठवले की ते पाहून रतीश यांना घामच फुटला होता. ओलाकडून त्यांना ९ लाख १५ हजार ८८७ रुपयांचे बिल पाठवण्यात आले. यासाठी ओलाच्या अॅपवर पाहिले असता ८५ हजार किलोमीटर इतका प्रवास केला त्यामुळे हे बील पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी ४५० किलोमीटरचा प्रवास केला होता.. हे बील पाहून चालक देखील थक्क झाला. पण नंतर मात्र ओलाने लाखोंचे बिल पाठवल्याबद्दल रतीश यांची माफी मागितली होती आणि तांत्रिक बिघाडामुळे आकडेवारी चुकल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

Story img Loader