ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्या दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेत असतात. कमी वेळ, जलद मार्ग आणि आरामदायी असा हा प्रवास अनेक ग्राहकांसाठी सोयीस्कर ठरतो. त्यामुळे आपल्यातील अनेक जण या कंपन्यांच्या कॅबमधून प्रवास करतात. पण, अनेकदा कॅब ड्रायव्हरच्या गैरवर्तनाच्या तक्रारी ग्राहकांकडून येत असतात. बंगळुरूमधील एका तरुणीला कॅब ड्रायव्हरने बनावट स्क्रीनशॉट दाखवून जास्त पैसे घेण्याचा प्रयत्न केला केला असा तिने पोस्टमध्ये दावा केला आहे. नेमकं घडलं काय ते या लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
तुम्ही कॅब सेवा वापरत असाल तर तुम्हीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. बंगळुरूमधील एका तरुणीने ‘ओला’ ड्रायव्हरचा बनावट पेमेंट घोटाळा उघडकीस आणला आहे.तरुणीने सांगितले की, बंगळुरूमधील ‘विल्सन गार्डन’ येथे कोचिंग क्लासला जाण्यासाठी तिने कॅब बुक केली होती. लोकेशनवर पोहोचल्यानंतर त्याने ‘७४९ रुपये झाले मॅडम’ असे सांगून स्वतःचा फोन दाखवला. हे पाहून तरुणीला आश्चर्य वाटले. कारण – कॅब बुक करताना ॲपमध्ये भाडे सुमारे २५४ रुपये दाखवले जात होते. तरुणीने शेअर केलेली पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा पाहा.
पोस्ट नक्की बघा…
कॅबचे २५४ रुपये भाडे झालेलं असताना देखील ड्रायव्हरने बनावट स्क्रीनशॉट दाखवून ७४९ रुपये भाडे झाल्याचे महिलेला सांगितले आणि तिची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत केला. पण, ड्रायव्हरला अचानक भाडे कसे वाढले असा प्रश्न विचारला असता तो धक्का बसल्याचे नाटक करू लागला. कॅब ड्रायव्हरने बनावट स्क्रीनशॉट आधीपासून तयार करून ठेवला होता. त्याने ७४९ रुपये द्या नाहीतर ॲपमध्ये तक्रार नोंदवा असा पर्याय तरुणी समोर ठेवला. तरुणीने तक्रार करण्याचा निर्णय घेतल्यावर त्याने योग्य भाडे स्विकारले.
सोशल मीडियावर ही पोस्ट Reddit ॲपवरून महिलेने शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने संपूर्ण घटना लेखी नमूद केली आहे. या घटनेने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही जण ‘सावधगिरी बाळगल्यास असे घोटाळे टाळता येऊ शकतात’ ; असे कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत. या पोस्टच्या कमेंटमध्ये एका यूजरने म्हटले की, ‘माझ्याबरोबर देखील अशी एक घटना घडली. ड्रायव्हरने मला दाखवले की, त्याचे बिल १९४६ रुपये आहे, पण ‘उबर’ ६७८ रुपये दाखवत आहे. मला त्याला पैसे द्यावे लागले कारण माझ्याबरोबर माझे आजारी आई-वडील देखील होते. तर दुसरा युजर म्हणत आहे की, ‘असे घोटाळे खूप वाढले आहेत. त्यामुळे कॅब बुक करताना, ड्रायव्हरची माहिती व किती भाडे झाले इत्यादी माहितीचा स्क्रीनशॉट घेऊन घेऊन ठेवणे फायदेशीर ठरेल.