सोशल मीडियावरील सुपरहिट डान्सिंग दादी पुन्हा एकदा चर्चेत आहे. आपल्या हटके डान्सने, हावभावाने डान्सिंग दादी सर्वांना वेड लावत आहे. आता या डान्सिंग दादीने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवला आहे. यंदा डान्सिंग दादीने टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ मधल्या ‘जवानी’ सॉंगवर देसी ठुमके लावत ताल धरला आहे. आतापर्यंत या डान्सिंग दादीचे बरेच डान्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण यंदाचे त्यांचे देसी ठुमके पाहाल तर नक्कीच त्यांचे फॅन होऊन जाल.
बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या हिरोइनला सुद्धा मागे टाकतील अशा रवि बाला शर्मा सोशल मीडियावर ‘डान्सिंग दादी’ म्हणून फेमस आहेत. त्यांच्या डान्सचे बरेच व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आहेत. वेगवेगळ्या बॉलिवूड गाण्यांवरही आजी थिरकताना दिसताना. आता त्यांनी टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडे स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर २’ मधल्या ‘जवानी’ सॉंगवर देसी स्टाईलने भन्नाट डान्स केला आहे.
ज्या वयात लोकांना नीट जागचं हालताही येत नाही, अशा वयात अगदी तरुण मुलीनं डान्स करावं, अशी लचक त्यांच्या डान्समध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये अनेकांना सुखावणारा आणि निखळ आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. ‘द जवानी’ गाण्यावर डान्स करताना त्यांची दिलखेचक स्माईल नेटकऱ्यांचं मन जिंकून घेत आहे.
त्यांचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं असून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या आजीची तुलना बॉलिवूडमधील अभिनेत्र्यांशी केली आहे. आजीच्या या व्हिडीओला आतापर्यंत ६४ हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं तर सहा हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.
डान्सिंग दादी रवी बाला यांनी त्यांच्या लहानपणापासूनच डान्सची आवड आहे. शाळा आणि कॉलेजात असताना या आजींनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. मात्र लग्नानंतर त्यांच्या सासरी त्यांचं डान्स करणं कुणालाच पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांनी डान्सला रामराम ठोकला होता.
लग्नानंतर २७ वर्षांनी रवी बाला यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पतीचं कॅन्सरमुळे निधन झालं. पतीची साथ सुटल्यानंतर त्या एकट्या पडल्या होत्या. यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या डान्सिंगला सुरूवात केली. विशेष म्हणजे आता त्यांचं कुटुंबही त्यांना पाठिंबा देत आहे. त्यांनी एका स्पर्धेत भाग घेतला आणि याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर त्या सोशल मीडियावर सेलिब्रिटी बनल्या.
डान्सिंग दादी रवी बाला यांनी त्यानंतर सलग आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरू केली. ते व्हायरल सुद्धा झाले. त्यांचे फॉलोअर्स वेगानं वाढले. रवी बाला यांच्या प्रत्येक डान्सना नेटिझन्सची चांगलीच पसंती मिळू लागली. आता केवळ सामान्य लोक नाही तर अनेक बॉलिवूड स्टार्ससुद्धा आजींचे फॅन झाले आहेत.