Viral video: सोशल मीडियावर तुम्हाला दिवसागणिक एकाहून एक भन्नाट प्रकार पाहायला मिळतात. जगाच्या कोणत्याही टोकावर एखाद्या व्यक्तीने केलेले धाडस असो किंवा सादर केलेली छानशी कला. हातातल्या मोबाइलवर आपण हे सगळे अगदी सहज पाहू शकतो. नुकताच एका आजीने गायलेल्या एका गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या वयातही त्यांच्यातील उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद वाखाणण्याजोगा असतो. आताही त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये त्यांनी डान्स नाही तर मस्त गाणे गायले आहे. यांचा आवाज ऐकून आपल्याला छान तर वाटतेच पण आपल्या चेहऱ्यावर नकळत एक स्माईल येते.

निळी साडी, डोक्यावर पदर सावरत “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं, ख़्वाबों में छुपाया तुमको, यादों में बसाया तुमको, मिलोगे हमें तुम, जानम कहीं न कहीं” असं पोटतिडकीने गाणाऱ्या आजीबाई तितक्याच गोड वाटतात. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, त्या आजी कोण आहेत, हे मात्र अद्याप समजलेलं नाही. “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ये दिल बेक़रार करें के नहीं” हे ‘दिवाना’ चित्रपटातील गाणं 1992 मध्ये तुफान लोकप्रिय झालं होतं. जवळपास तीस वर्ष उलटून गेल्यानंतरही या गाण्याची जादू ओसरलेली नाही. कुमार सानूच्या दर्दभऱ्या आवाजातील हे गाणं नव्वदच्या दशकात प्रत्येकाच्या ओठी होतं. प्रेमभंग झालेल्या तरुणाईसाठी तर ते अँथम साँगच झालं होतं.

तीन दशकांनंतरही हे गाणं तितकंच ताजं टवटवीत वाटतं. कुमार सानू यांना या गाण्यासाठी मानाच्या फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कारही मिळाला होता. प्रसिद्ध गीतकार समीर यांच्या लेखणीतून या गाण्याचे शब्द उतरले होते. या गाण्यात ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री दिव्या भारती यांची जोडी होती. दुर्दैवाने हे दोन्ही कलाकार आज आपल्यात नाहीत. ऋषी कपूर यांचे गेल्याच वर्षी निधन झाले. या गाण्यात नसला, तरी अभिनेता शाहरुख खानची सिनेमातील व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

पाहा व्हिडीओ

दिवाना सिनेमातील लोकप्रिय गाणी

‘दिवाना’ चित्रपटातील “सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं… ” सोबतच “ऐसी दिवानगी… देखीं नहीं कभी”, “तेरी उमीद तेरी इंतजार”, “पायलिया” अशी रोमँटिक गाणीही गाजली होती. कुमार सानू यांच्यासोबतच अल्का याज्ञिक, साधना सरगम, विनोद राठोड यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी लोकप्रिय झाली होती.