Viral Video : भारतीय रेल्वे सगळ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. लाखो लोकांचा प्रवास दररोज रेल्वेमुळे सोपा आणि सोईस्कर होतो. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकदा रेल्वेस्थानकावर किंवा ट्रेनमध्ये तिकिटांची तपासणी केली जाते. प्रवासादरम्यान तुमची गाठ तिकीट तपासनीसाशी (टीसी) एकदा तरी पडली असेलच. तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून हे टीसी योग्य तो दंड वसूल करतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे; जे पाहून तुम्ही वृद्ध महिलेच्या प्रामाणिकपणाचं कौतुक कराल.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ ट्रेनमधील आहे. एक आजी रेल्वेमधून प्रवास करीत असते आणि ती सोबत तिच्या बकरीलासुद्धा ट्रेनमधून घेऊन जाते. त्यानंतर तिकीट तपासणारे अधिकारी आजींना तिकीट दाखवायला सांगतात. तेव्हा आजी अधिकाऱ्याच्या हातात तीन तिकिटे देते. एक आजीचे, दुसरे तिच्या बकरीचे व तिसरे तिच्यासोबत असणाऱ्या अज्ञात व्यक्तीचे. आजींनी प्रवासादरम्यान बकरीचेसुद्धा तिकीट काढले आहे हे पाहून तिकीट तपासणाऱ्या टीसीलाही हसू आवरत नाही. त्यालाही महिलेच्या प्रामाणिकपणाचा अभिमान वाटतो. बकरीला रेल्वेमध्ये घेऊन आलेल्या आजींचा हा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा बघाच.
हेही वाचा… Video: सीएसएमटी रेल्वे स्टेशनवर अचानक सर्वजण नाचू लागले; नेमकं काय घडलं? चकित करणारं कारण आलं समोर
व्हिडीओ नक्की बघा :
बकरीचेसुद्धा काढले तिकीट :
तुम्ही व्हिडीओत पाहू शकता की, तिकीट तपासणारे अधिकारी तीन तिकिटे पाहून आजीला विचारताना दिसतात. बकरीचेसुद्धा तिकीट काढले का? त्यावर ती महिला ‘हो’ असे उत्तर देते आणि नकळत हसते. हे उत्तर ऐकून टीसीसुद्धा हसताना दिसत आहे. अनेक जण विनातिकीट बिनधास्त प्रवास करतात; पण आजींचा हा प्रामाणिकपणा तुम्हालाही विचार करायला नक्कीच भाग पाडेल.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ @Dprashantnair यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. ‘आजीसाठी बकरी तिच्या कुटुंबातील एक सदस्य आहे आणि कुटुंबातील सदस्यांसाठी आपण सगळे असंच करू’ असं एक युजर म्हणत आहे. तसेच ‘आजींकडून खूप काही शिकण्यासारखं आहे’, ‘प्रामाणिक भारतीय’ असे अनेक जण म्हणत आहेत. तसेच काही जण आजीच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.