आपल्याकडे महागडी आलिशान कार असावी, असं अनेकांचं स्वप्न असतं. काहीजण आपलं स्वप्न पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात. तर काहींना आपलं स्वप्न अगदी सहज पूर्ण करता येतं. पण जो व्यक्ती आयुष्यभर महागड्या कारचं स्वप्न बघतो आणि आयुष्याच्या शेवटी जेव्हा त्याचं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा तो आनंद शब्दांत मांडता येत नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने निवृत्तीनंतर आलिशान ‘लॅम्बोर्गिनी’ कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी केल्यानंतर संबंधित वृद्धाचा आनंद गगनात मावत नाहीये. वृद्धाला या कारमधून नीट उतरताही येत नाहीये. पण त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मात्र अनेकांचं मन जिंकत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘द फिगेन’ नावाच्या ट्विटर खात्यावरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ४१ सेकंदाच्या या व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती नव्याकोऱ्या लॅम्बोर्गिनी कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. पण संबंधित व्यक्तीला वयामुळे कारमधून उतरता येत नाहीये. ती व्यक्ती कशीबशी कारमधून उतरताना दिसत आहे. कारमधून खाली उतरल्यानंतर वृद्धाला आभाळाएवढा आनंद झाला. तो आपलं हसू रोखू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीने निवृत्तीनंतर ही आलिशान महागडी कार विकत घेतली आहे.
वृद्ध व्यक्ती कारमधून बाहेर पडण्यासाठी थोडीशी धडपड करताना दिसत आहे. परंतु जेव्हा ते बाहेर पडण्यात यशस्वी होतात, तेव्हा ते मोठ्याने हसत जमिनीवर पडतात. आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न जेव्हा पूर्ण होतं, तेव्हा किती आनंद होऊ शकतो, हे या वृद्धाच्या चेहऱ्यावरील हावभावावरून स्पष्टपणे दिसत आहे.