देशभरात नोटांनी नागरिकांना हैराण केले असताना ‘ईबे इंडिया’ या ई-कॉमर्स वेबसाइटवर जुन्या नोटांना चांगली किंमत मिळत आहे.  पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा सरकारने चलनातून हद्दपार केल्यानंतर लोक आपल्या कष्टाच्या पैसा सुरक्षित करुन घेण्यासाठी बँकेमध्ये गर्दी करत असताना ‘ईबे’च्या वेबसाइटवर चलनातून हद्दपार केलेल्या हजार आणि व्यवहारात नव्याने दाखल झालेल्या दोन हजारच्या नोटांचा लिलाव करण्यात येत आहे.

चलनातून हद्दपार झालेल्या हजारच्या नोटांना ईबेच्या वेबसाइटवर लाखोंच्या घरात किंमत मिळत असून दोन हजारांच्या नव्या नोटांनाही चांगली किंमत मिळताना दिसत आहे. दुर्मिळ नोटा जमविण्याचा छंद असलेली मंडळी विशिष्ट नोटांना लाखो किंवा कोटीमध्ये किंमत देण्यास तयार होत असतात. याच पार्श्वभूमीवर ‘ईबे इंडिया’च्या वेबसाइटवर हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटांची किंमत लाखोंमध्ये लावली जात आहे. आपल्या देशातच नाही तर जगभरात अनेकजण ७८६ हा अंक शुभ अंक मानतात. ७८६ क्रमांक असलेल्या नोटा आपल्याकडे जमविण्याचा छंद अनेकांना आहे. हेच लक्षात घेवून एका व्यक्तीने ‘ईबे इंडिया’ या ई-कॉमर्स वेबसाइटवर ७८६ क्रमांक असलेल्या नोटा विक्रीस काढल्या आहेत.

नोटांच्या या लिलावामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचे हस्ताक्षर असलेली जुनी १००० रुपयांची नोट तुम्हाला ३० लाख रुपये मिळवून देऊ शकते. ‘ईबे’ वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ७८६ सिरीज असलेली १००० रुपयांची नोट विक्रीस काढण्यात आली आहे. आतापर्यंत या नोटेला ३० लाख रुपये बोली लावण्यात आली आहे. या बोलीमध्ये  २४ नोव्हेंबर पर्यंत सहभागी होणे शक्य आहे.

‘ईबे इंडिया’च्या वेबसाइटवर दोन हजार रुपयाच्या ५ नोटा विक्रिस काढल्या असून त्यांची किंमत देखील लाखोच्या घरात आहे. दुर्मिळ नोटांचा छंद जोपासणाऱ्या व्यक्तिंना नोटा खरेदीवर ऑफर देखील देण्यात आली आहे. २००० च्या पाच नोटा १ लाख ५० रुपये देणाऱ्यास ७८६ क्रमांकाची नोट मुफ्त देण्यात येणार असल्याची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे.