Assaulting Policeman Video Fact Check : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत असलेला एक व्हिडीओ आढळून आला आहे. त्यामध्ये एका पोलिसाला काही लोक मिळून जबर मारहाण करीत असल्याचे दिसतेय. या हल्ल्यासाठी एक राजकीय नेता जबाबदार असल्याचा दावा या व्हिडीओसह करण्यात येत आहे. युजरने ‘राजस्थान पोलिस’ हॅशटॅग वापरून हा व्हायरल व्हिडीओ राजस्थानमधील असल्याचे सूचित केले आहे. मात्र, या व्हिडीओबाबत तपास सुरू केला तेव्हा एक वेगळेच सत्य समोर आले आहे, ते नेमके काय आहे ते जाणून घेऊ.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर रिया मीना हिने भ्रामक दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि व्हिडीओमधून मिळालेल्या स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला ‘एक्स’वर पोस्ट केलेला एक व्हिडीओ आढळला. ज्याने अप्रत्यक्षपणे पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला करणारी व्यक्ती राजकारणी असू शकते, असे सूचित केले.
यावेळी Google च्या रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला कोणतेही परिणाम मिळाले नाहीत. म्हणून आम्ही Yandex या रशियन सर्च इंजिनचा वापरून स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च चालवले.
त्यातून आम्हाला ओडिशा बाइट्स या YouTube चॅनेलवरील एक व्हिडीओ आढळून आला, जो तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता, असे लक्षात आले.
व्हिडीओच्या शीर्षकात म्हटले आहे (भाषांतर) : व्हायरल अलर्ट : दिल्लीतील जिममालकाने पोलिसाला केली मारहाण
वर्णनात असे म्हटले आहे (भाषांतर) : दिल्ली पोलिसांच्या एका पोलिसाला घरात काही लोक मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसाला वारंवार मारले जात असून, शिवीगाळ केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आम्हाला घटनेबद्दल अधिक बातम्या आढळल्या.
बातमीत असे म्हटले आहे (भाषांतर) : पोलिसांनी जिम मालक आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका दिवसात दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. एक व्हिडीओ ऑनलाइन समोर आल्यानंतर कथितपणे ऑन-ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यांपैकी एकाने त्यांच्यावर हल्ला केला आहे, असे पोलिसांनी गुरुवारी सांगितले. व्हिडीओतील सुशील आणि रविंदर नावाच्या दोन पोलिसांना कथित घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न दिल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
निष्कर्ष :
२०२१ चा एक जुना व्हिडीओ; ज्यात दिल्लीतील एका ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यावर जिमच्या मालकाने हल्ला केल्याचे दिसून येत आहे. तो व्हिडीओ आता एका राजकारण्याने अलीकडेच पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याच्या दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोणत्याही राजकारण्याचा समावेश नाही आणि व्हिडीओ अलीकडील नाही. त्यामुळे व्हायरल केला जात असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे.