सध्या सोशल मीडियावर मध्य प्रदेशातील जबलपूरचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली एक वृद्ध महिला नर्मदा नदीच्या पाण्यावरुन चालत असल्याचा दावा करण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला नदीच्या पाण्यावर चालताना दिसत आहे. पण तिच्या पायाचे पंजे पाण्यात बुडाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी व्हिडीओतील महिलेला नर्मदा देवी मानून पूजाही करायला सुरु केलं आहे.
मागील काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या घाटावर एक महिला दिसत होती. तिचे काही व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ती महिला नर्मदा नदीच्या पाण्यावरुन चालताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात अंधश्रद्धा पसरली आणि शेकडो लोकांनी या महिलेला‘नर्मदा देवी’ मानून तिची पूजा करायलाही सुरुवात केली होती.
महिला अनेक दिवसांपासून बेपत्ता –
हेही पाहा- शेतातील गव्हाची कापणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड, व्हायरल Video पाहून तुम्हीही कौतुक कराल
दरम्यान, ही महिला जिथे जायची तिच्या मागून लोकही जायला लागले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली. या तपासात पोलिसांना एक धक्कादायक बाब समजली ती म्हणजे ही महिला मागील एक वर्षापासून बेपत्ता आहे.
या महिलेने चौकशीत आपले नाव ज्योतीबाई वय ५१ असल्याचं सांगितले. तर नर्मदापुरमची रहिवासी असल्याचेही तिने सांगितले. पोलिसांनी तिची अधिक चौकशी केली असता ती मे २०२२ पासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार या महिलेच्या मुलाने पोलिसांत केल्याचं उघडकीस आलं आहे. शिवाय आपल्या आईची मानसिक स्थिती ठीक नसल्याचंही तिच्या मुलाने मिसिंग रिपोर्टमध्ये लिहिलं होतं.
…त्यामुळे लोकांना वाटलं ती पाण्यावर चालते –
व्हायरल व्हिडीओबाबत या महिलेने पोलिसांना सांगितले की, ज्या ठिकाणी ती नदीत उभी होती त्या ठिकाणी पाणी कमी होते. त्यामुळे लोकांना वाटलं की, मी पाण्यावरुन चालत आहे. पण प्रत्यक्षात तसं काही नाही. शिवाय माझे कपडे ओले नव्हते यावर तिने सांगितले की, उन्हामुळे कपडे लवकर सुकले होते. या प्रकरणाची माहिती देताना ASP संजय अग्रवाल यांनी सांगितलं की, ज्योती नावाच्या वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर महिलेचा मुलगा आल्यानंतर तिला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं असून आता ती तिच्या घरी गेली आहे. शिवाय लोकांनी दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओंपासून दूर राहावे आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन देऊ नये, असं आवाहन देखील एएसपींनी केलं.