केळे तब्येतीसाठी अत्यंत गुणाकारी फळ म्हणून ओळखले जाते. परंतु या केळ्याचा वापर एखादी व्यक्ती सूड घेण्यासाठी सुद्धा करु शकते ही कल्पना देखील कोणी करणार नाही. परंतु होय हे सत्य आहे. नेब्रास्कामधील ओमाहा शहरात एका स्त्रीने झालेल्या भांडणाचा सूड घेण्यासाठी शस्त्र म्हणून चक्क केळ्याचा वापर केला. या प्रकरणाची ओमाहा पोलीस सध्या सखोल चौकशी करत आहेत.
ओमाहा शहरात बेन्सन टॉवरमध्ये राहणाऱ्या एका ५३ वर्षीय व्यक्तिने २३ वर्षीय स्त्रीशी जोरदार भांडण केले. गाडी पार्किंगच्या जागेवरुन सुरु झालेले हे भांडण अखेर पोलीस चौकीत पोहोचले. पोलिसांनी दोघांच्या या मतभेदांवर तात्पुरता तोडगा काढला. परंतु त्या स्त्रीने या भांडणाचा सूड घेण्यासाठी दररोज त्या व्यक्तिला केळे मारण्यास सुरुवात केले. तो व्यक्ती ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर निघायचा त्यावेळी ही स्त्री घराच्या बाल्कनीतून त्याच्यावर केळे फेकून मारायची. हा प्रकार आठवडाभर सुरु होता. अखेर रोजच्या रोज अंगावर पडणाऱ्या केळ्यांची तक्रार त्याने पोलिसात केली.
आणखी वाचा- घरासाठी कायपण: एका कुटुंबात एका महिन्यात २३ वेळा घटस्फोट आणि विवाह
पोलिसांनी प्रथमदर्शनी केलेल्या चौकशीत त्या स्त्रीने केवळ एकदाच केळे फेकून मारल्याचे मान्य केले. “त्या व्यक्तिने माझ्या मुलीला कुरुप म्हटले होते, त्यामुळे मी त्याला केळे फेकून मारले.” असे स्पष्टीकरण त्या स्त्रीने दिले. एखाद्याला केळे फेकून मारणे हा गुन्हा नाही म्हणून तिला पोलिसांनी सोडून दिले. परंतु या प्रकरणाची चौकशी संपलेली नाही. अद्याप पोलीस त्या केळे फेकणाऱ्या व्यक्तिच्या शोधात आहेत.