जगभरातील मुस्लिम देशांत मंगळवारी बकरी ईद साजरी केली. या दिवशी बक-याची कुर्बानी देण्याची प्रथा मुस्लिम बांधवात आहेत. पण बकरी ईदच्या दुस-या दिवशी बांगलादेशमध्ये जे घडले ते मात्र अंगावर काटा आणण्यासारखेच होते. बांगलादेशमध्ये मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. मंगळवारी येथेही मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी केली गेली. मात्र त्यांनतर कुर्बानी दिलेल्या बक-यांच्या रक्ताचे शहरातल्या गल्लीबोळ्यातून अक्षरश: पाट वाहू लागले.
बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरात बकरी ईदच्या दिवशी ही परिस्थिती होती. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांना आपल्या घराशेजारी किंवा बिल्डिंगच्या पार्किंग लॉटमध्ये बक-यांची कुर्बानी द्यावी लागली. मुळात या ठिकाणी पाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे शहरातल्या प्रत्येक गल्लीबोळ्यात गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून ठिकठिकाणी बक-यांची कुर्बानी दिल्यामुळे ते रक्तही यात मिसळले आणि शहरात रक्ताचे पाट वाहू लागले.
यामुळे अनेकांना घरातून बाहेर पडणे अतिशय कठिण झाले आहे. घराबाहेर रक्त मिसळलेले पाणी वाहत असल्याने अनेकांनी घरात राहणेच पसंत केले. इतकेच नाही तर कुर्बानी दिल्यानंतर जनावरांचे इतर टाकाऊ अवशेष देखील पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती इथल्या स्थानिकांनी दिली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत तसेच हे अवषेश फेकून देण्यासाठी कोणतीही सोय नसल्याची नाराजीही येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा