जगभरात आज ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुलांनी ‘मदर्स डे’ निमित्त आपल्या प्रेमळ आईला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी काहीतरी खरेदी केले असेल, तर कोणी आईला बाहेर जेवायला घेऊन जाण्याचा प्लॅन केला असेल. पण सध्या सोशल मीडियावर एका आईने आपल्याला ‘मदर्स डे’सा कसं गिफ्ट पाहिजे हे तिच्या मुलांना सांगितलं आहे. शिवाय आईने मागितलेलं गिफ्ट देणं त्या मुलीसाठी खूप अवघड असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर ‘मदर्स डे’च्या निमित्ताने पंजाबी आईने आपल्या मुलीला नेमकं काय गिफ्ट मागितलं आणि तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल का होतोय ते जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका पंजाबी आईने स्वतः मुलांकडून तिच्या आवडीचे गिफ्ट मागितले आहे. शिवाय व्हिडीओतील आईची बोलण्याची शैली पाहून अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे. हा भन्नाट व्हिडिओ ‘पंजाबी मॉम्स’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सोनिया खत्री नावाची एक महिला आपल्या मुलांकडे अनोखी भेटवस्तू मागताना दिसत आहे.
ती म्हणते, “यंदाच्या मदर्स डेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ करून पूजा करावी लागेल. मग मला बेड टी द्यावी लागेल आणि त्या दिवशी तुम्हाला घरातील सर्वांसाठी अन्न बनवावं लागेल.” इथपर्यंत तर ठीक होतं, पण या पुढे व्हिडीओतील आईने आपल्या मुलांकडे जे मागितलं आहे. ते एकून मुलांना आश्चर्याचा धक्का बसला असेल यात शंका नाही. हो कारण ती महिला पुढे म्हणते, “‘मदर्स डे’च्या दिवशी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करायचा नाही, तुमचा मोबाईल दिवसभर माझ्याकडे ठेवावा लागेल, शिवाय आठवडाभर स्विगी आणि झोमॅटोवरुन काहीही ऑर्डर करायची नाही. तसेच आठवडाभरासाठी काहीही ऑनलाइन खरेदी करायची नाही, हे गिफ्ट मला पाहिजे” असं ही आई आपल्या मुलांना सांगताना दिसत आहे.
लग्न कर आणि मला आजी बनव –
दरम्यान, व्हिडीओतील आईने आपल्या मुलीला, “लवकरात लवकर लग्न कर आणि मला आजी बनव.” असं सांगितलं आहे. लग्नात काय आहे असे प्रश्न विचारु नको असंही तिने मुलीला खडसावलं आहे. शिवाय तुला मुलं झाल्यावर लोकं मला एवढ्या तरुण वयात तु आजी कशी बनली? असं विचारतील याची मी वाट पाहत आहे, असंही महिला म्हणत आहे. ऐन’मदर्स डे’ आईने असं मागितलेलं गिफ्ट पाहून अनेक मुलांना धक्का बसला आहे. मात्र, अनेक महिलांनी या व्हिडीओतील आईचं समर्थन केलं आहे. नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने ही महिला पालकांच्या मनातलं बोलली असल्याचं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, व्हिडीओ खूप मजेदार आणि जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे.