अमेरिकन अब्जाधीश बिल गेट्स यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका गटाराच्या आत जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल होत असून अशा श्रीमंत व्यक्तीला गटारात जाण्याची गरज का पडली, असा प्रश्न अनेक युजर्स उपस्थित करत आहेत. १९ नोव्हेंबर हा वर्ल्ड टॉयलेट डे म्हणून साजरा करण्यात येतो आणि हा व्हिडीओ त्याच दिनानिमित्त काढण्यात आला होता.
बिल गेट्स ब्रुसेल्समधील सीवर म्युझियमला भेट देण्यासाठी म्हणून एका गटारामध्ये उतरले होते. खुद्द बिल गेट्स यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. त्यात ते गटारात उतरून ब्रुसेल्सच्या सांडपाणी व्यवस्थेचा छुपा इतिहास जाणून घेताना दिसत आहेत.
व्हिडीओत बिल गेट्स गटारातील विविध गोष्टींवर काम करणाऱ्या वैज्ञानिकांना भेटताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांनी शहारातील सांड पाण्यावर नेमकी कशी प्रक्रिया केली जाते याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या शहरात सीवर आणि ट्रीटमेंट प्लांटचे २०० मैल लांबीचे जाळे आहे, ज्यात शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
गेट्स यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, मला यावर्षीच्या जागतिक शौचालय दिनानिमित्त ब्रुसेल्सच्या सांडपाण्याचा छुपा इतिहास जाणून घ्यायचा होता. तसेच जागतिक आरोग्यामध्ये सांडपाण्याची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, मला ब्रुसेल्सच्या अंडरग्राउंड म्युझियममधून खूप वेगळा अनुभव मिळाला. शहरातील वेस्ट वॉटर सिस्टमच्या इतिहासाचे दस्ताऐवजीकरण. १८०० मध्ये सांडपाणी शहराच्या सेने नदीत सोडण्यात आले, त्यामुळे कॉलराची भीषण साथ पसरली. पण, आज शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीवर आणि ट्रीटमेंट प्लांटसचे २०० मैलांचे जाळे आहे.
बिल गेट्स स्वच्छतेबाबत जागरुकता वाढवण्यासाठी खूप सक्रियपणे काम करताना दिसतात. २०१५ मध्ये त्यांनी चिखलातील पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवण्याच्या प्लांट्स उभारणीसाठी आयोजित एका कार्यक्रमातही भाग घेतला होता. स्वच्छतेशी संबंधित अशा अनेक कार्यक्रमांमध्ये गेट्स अनेकदा दिसले आणि त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले.