आयुष्यात आपल्या कमाईचा एक तरी दागिना घडवला जातो. सासू आपल्या सुनेसाठी.. आई आपल्या मुलींसाठी आपले दागिने सर्रासपणे राखून ठेवते. सौंदर्याचा साज दागिना. गरिबीची लाज राखणारा दागिना…प्रत्येक भारतीयाला सोन्याच्या दागिन्यांची भलतील हौस…महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वांनाच सोन्याचे दागिने आकर्षित करतात. हे दागिने बनवणे ही सुद्धा एक कला आहे. पण सोन्याचे दागिने नेमके कसे बनवले जातात? असा प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आलाच असेल. सध्याच याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. तुमच्या मानेला शोभणारी सोन्याची चैन तुमच्यापर्यंत येईपर्यंत कशा कशा यंत्रांमधून प्रवास करते, याचा रोचक प्रवास दाखवणारा हा व्हिडीओ सध्या नेटिझन्सच्या पसंतीला पडत आहे. २४ कॅरेट सोन्याचे बिस्किट 1KG सोन्याच्या चैनीत कसं रूपांतरित होतात, हे या व्हिडीओमधून दिसून येतंय.
२४ कॅरेट बिस्किटांपासून बनवलेली १४ कॅरेटची चैन
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सोन्याची चैन कशी तयार केली जातेय, हे दाखवण्यात आलंय. या व्हिडीओमधली सोन्याची चैन ही एक किलोग्राम वजनाची आहे. या सोन्याच्या चैनला अगदी पारंपारिकरित्या घडवलं जातं. सोन्याची चैन घडवण्याची ही प्रक्रिया पाहून प्रत्येक जण हैराण झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुरूवातीला एक व्यक्ती सोन्याचे बिस्किट गोल्ड स्क्रॅचचं वजन करताना दाखवतोय. त्यानंतर त्याला इतर धातूंसोबत मिक्स करून वितळवून घेतलं जातं. त्यानंतर वितळून तयार केलेल्या मिश्रणावर आणखी वेगवेगळ्या प्रक्रिया करत छोट्या गोल कड्यांच्या आकारात बनवले जातात. हे वेगवेगळे छोटे गोल कडे नंतर एकात एक घालून त्यांना पॉलिश केल्यानंतर सोन्याची चैन तयार झालेली पहायला मिळते. तयार झालेल्या या सोन्याच्या चैनीचेचे वजन पुन्हा करताना दाखवण्यात येतंय. शेवटी, चैनीच्या मधोमध असलेले लॉक सुद्धा सोन्याच्या पाण्यापासून बनवलं जातं. २४ कॅरेट सोन्याच्या बिस्किटांपासून बनवलेली सोन्याची चैन प्रत्यक्षात १४ कॅरेट सोन्याची असते.
आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला
‘सुपरकार ब्लोंडी’ नावाच्या फेसबूक अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४८ लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. ८९ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. तर अडीच हजारांहून अधिक लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. सोन्याची चैन बनल्याची ही प्रक्रिया पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. असे व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि युजर्ना खूप आवडतात.