रेल्वे रूळ ओलांडताना निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे वारंवार रेल्वे रूळ ओलांडू नका, असा सल्ला दिला जातो. मात्र, तरीही काही धाडसी लोक रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घाईत जीव धोक्यात घालतात. रेल्वे रूळ ओलांडताना अनेकांचा मृत्यूही ओढवला आहे. मात्र, तरीही लोक त्यातून काहीच धडा घेत नाहीत. यातच एका महिला स्कुटीवरून आपल्या दोन मुलांना घेऊन रेल्वे ट्रॅक ओलांडण्यााचा प्रयत्न करीत होती; पण तिची स्कूटी अचानक ट्रॅकमध्ये अडकते आणि ती काढत असताना वेगाने एक ट्रेन आली. त्यानंतर जे काही झाले, ते फारच भयानक होते.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला आपल्या दोन मुलांसह स्कुटीवर बसून रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. यावेळी स्कूटर अगदी रेल्वे रुळांच्या मधोमध येताच तिचे चाक अडकते. यावेळी त्या महिलेने अडकलेले चाक काढण्याचा जीव तोडून प्रयत्न केला; पण तिला यश आले नाही. यावेळी शेवटी मागे बसलेल्या मुलीनेही खाली उतरुन स्कूटर ढकलण्यास सुरुवात केली; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. इतक्यात ट्रेन आली.
स्कुटी राहिली रुळांमध्ये अडकून
यावेळी दोन्ही मुलांना खाली उतरून बाजूला उभे केले. ट्रेन येताना पाहून महिला आणि तिची मुलगी घाबरली. पण, तरीही रुळांमध्ये अडकलेली स्कूटर बाहेर काढण्याचा त्या प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात ट्रेन आली आणि स्कूटरला जोरात धडक देत पुढे घेऊन गेली.
सुदैवाने ती महिला आणि दोन्ही मुलांचा जीव वाचला. थोडा अधिक निष्काळजीपणा किंवा उशीर झाला असता, तर तिघांनाही जीव गमवावा लागला असता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पाहिल्यानंतर अनेक जण आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
एका युजरने लिहिले की, असे क्रॉसिंग बनवलेच का जाते; जिथे वाहने पूर्णपणे अडकून बसतात. दुसऱ्या युजरने लिहिले की, जेव्हा मी पहिल्यांदा स्कूटर पुढे जात नसल्याचे पाहिले, तेव्हा मी उतरायला हवे होते; पण जिद्द ही एक गोष्ट आहे. तिसऱ्याने लिहिले की, अशा घटनांमागील कारण केवळ निष्काळजीपणा आहे. घाईत रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांना हा व्हिडीओ दाखवावा.
आणखी एकाने लिहिले की, रेल्वे रूळ ओलांडू नका, अशा सूचना अनेकदा दिल्या जातात; पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग अशा घटना घडतात.