Child Snake Bite in Gaya: महिन्याभरापूर्वी बिहारच्या नवादा जिल्ह्यात एक तरूण सापाला दोनदा चावल्यानंतर सापाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा बिहारमध्येच अशाचप्रकारची दुसरी घटना घडली आहे. यावेळी एक वर्षांच्या लहान मुलाने सापाचा चावा घेतला. बिहारच्या गया येथे लहान मुलगा घरासमोर खेळत होता. त्यावेळी त्याला साप दिसला. खेळण्याची वस्तू समजून त्याने सापाचा चावा घेतला, अशी माहिती समोर येत आहे. लहान मुलाने सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा मृत्यू झाला असून लहान मुलगा सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेमुळे गावातील लोकांनाही आश्चर्य वाटले आहे. लहान मुलाच्या कुटुंबीयांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील कर्मचारीही ही बाब ऐकून हैराण झाले. सोशल मीडियावर आता या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये लहान मुलाने चावून फेकलेला साप दिसत आहे.
हे वाचा >> तरुणानं सापाचा दोनदा चावा घेतला आणि सापाचा झाला मृत्यू, नेमकं काय घडलं?
लहान मुलाच्या आईने लाईव्ह हिंदुस्तान वृत्त संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, आमचा मुलगा खेळत असताना त्याने चुकून सापाला हातात घेतले आणि खेळणं समजून सापाचा चावा घेतला. यानंतर जेव्हा साप मृताअवस्थेत आढळून आला तेव्हा घाबरलेल्या पालकांनी मुलाला घेऊन तात्काळच्या जवळच्या रुग्णालयात धाव घेतली.
सदर घटना १७ ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगितले जाते. फतेहपुर ठाण्याच्या हद्दीतील जमुहार गावातील लहान मुलगा कुंटुबीयांसोबत राहतो. मुलाचे नाव रियांश असल्याचे सांगितले जाते. मुलाने सापाला खेळणं समजून चावून-चावून मारून टाकलं.
बिहारमधील दुसरी घटना
जुलै महिन्यात बिहारच्या नवादा जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला होता. संतोष लोहार (३५) हा रेल्वे कर्मचारी राजौलीच्या जंगल परिसरात रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम करत होता. रात्रीच्या वेळेस झोपलेला असताना सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला. साप चावल्यामुळे जागा झालेला संतोषने सापाला पकडून त्याचा दोनदा चावा घेतला. सापाला चावल्याने आपल्या शरीरातील विष पुन्हा सापाच्या शरीरात जाऊ शकते, अशी त्याची धारणा होती. सापाचा चावा घेतल्यानंतर सापाचा तिथेच मृत्यू झाला. त्यानंतर संतोष लोहारने रुग्णालय गाठून उपचार घेतले.