सध्याच्या डिजीटल जमान्यात अनेकांची ऑनलाईन फसवणूक झाल्याच्या घटना आपण वाचत आणि पाहत असतो. शिवाय पोलिसांकडून सतत आर्थिक प्रलोभनांना बळी पडू नका, असा मेसेजदेखील देण्यात येतो. तरीदेखील अनेक लोक पैशाच्या मोहापायी सायबर क्राईमचे शिकार होतात. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने आयुष्यभर कमावलेली संपत्ती काही क्षणात गमावली आहे. दुर्देवाची बाब म्हणजे तो स्वत:च आपल्या आयुष्याची बर्बादी करण्यास कारणीभूत ठरला आहे.
एका क्लिकमध्ये सर्व संपत्ती गमावलेल्या व्यक्तीचे नाव मार्क रॉस असं असून त्याने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं सांगितलं आहे.या घटनेतील व्यक्तीने एक दोन नव्हे तर तब्ब्ल ८४ लाख रुपये गमावले आहेत. या व्यक्तीला एक क्रिप्टोकरन्सीची ऑफर आली होती, ज्यामध्ये गुंतवणुक केल्यास जास्तीचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्याने पैसे दिल्यानंतर त्याच्या खात्यात काहीच आलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियात राहणारा ५४ वर्षीय मार्क हा आयटी कर्मचारी आहे. मार्कने सांगितले की, “या फसवणुकीमुळे सर्वस्व गमावले. माझ्याकडे रोख रक्कम नव्हती, नोकरी नव्हती आणि माझ्याकडे माझे घरभाडे देण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे मी माझ्या वृद्ध आई-वडिलांसोबत राहाव लागत आहे. दरम्यान, मला आतादु सरी नोकरी मिळाली आहे पण माझी आयुष्यभराची कमाई मी गमावली आहे.”
तो पुढे म्हणाला, एका वर्षापूर्वी टेलिग्रामवर बोनस सपोर्टचा व्हिडिओ पाहिला होता. तो संशयास्पद होता, परंतु त्याला असे वाटले की जगभरातील शेकडो लोकांना चांगला रिटर्न मिळत आहेत. शिवाय काही रिटर्न भेटलेल्या लोकांशी आपलं बोलणंही झालं होतं. परंतु आता त्याला ते सर्व लोक असल्याचं समजलं आहे. शिवाय सर्व पैसे एकाच वेळी हस्तांतरित करून मोठी चूक केल्याचंही तो म्हणत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आधीच सर्व पैसे गमावले असताना आणखी एका स्कॅमरने त्याला गेलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी १०० डॉलर घेतले आणि ते पैसे घेऊन तोही फरार झाला. त्यामुळे मार्क सध्या खूप तणावाखाली असून त्याच्यासोबत घडलेल्या फसवणुकीच्या घटनेच्या मेसेजचे स्क्रीनशॉटही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो फसवणूक करणाऱ्यांकडे पैसे परत करण्याची विनंती करत असल्याचं दिसत आहे. या सर्व प्रकरणानंतर मार्कने पोलिसांत तक्रार केली आहे.