Lok Sabha Elections Result 2024 Funny Memes : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ घोषणा देत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र प्रत्यक्षात ४ जूनला जाहीर झालेल्या निकालात भाजपाला ३०० चा आकडा पार करणेही अवघड होऊन बसले. या निकालात एनडीएला ५४३ पैकी २९२ जागा मिळाल्या आहेत; तर भाजपाला २३९ जागा मिळाल्या आहेत. भाजपाचे ४०० पारचे स्वप्न भंगल्याने त्यांच्यासाठी हे मोठेच अपयश आहे.
दरम्यान, भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’च्या घोषणेवरून आता सोशल मीडियावर बऱ्याच मीन्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी ४०० पार काय ३०० पारही करता आले नाही, असे म्हणत भाजपाची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली आहे. अशातच अनेकांनी ४०० पार फक्त ब्रायन लाराच करू शकतो, असे म्हणत भाजपा आणि त्यांच्या युतीवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला ४०० जागांचे लक्ष्य गाठणारा अपेक्षित निकाल न मिळाल्याने, नेटिझन्सनी ‘Only Brian Lara Can Go 400 par’ या मेम फेस्टला सुरुवात केली. एक्सवर मोठ्या प्रमाणात असे ट्विट पोस्ट व्हायरल होत आहेत.
ब्रायन लाराचे रन्स अन् भाजपाची अब की बार ४०० पारची घोषणा; नेटिझन्सनी उडवली खिल्ली
लोकसभा निवडणूक निकाल २०२४ मध्ये एक्झिट पोलच्या तुलनेत अनपेक्षित बदल दिसून आला. भाजप ४०० हून अधिक जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. विशेष म्हणजे २०२४ च्या संसदीय निवडणुकीत ४०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून भाजपाने ‘अब की बार ४०० पार’ अशी प्रचार मोहीम राबवली होती. मात्र, भाजपाची ती मोहीम सपशेल धुळीला मिलाली आहे. त्यावरून विरोधकांसह आता नेटिझन्सदेखील भाजपाची खिल्ली उडवीत आहेत. अनेकांनी भाजपच्या ‘४०० पार’च्या घोषणेची तुलना प्रसिद्ध क्रिकेटर ब्रायन लारा याच्या विक्रमी ४०० धावांबरोबर केली आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात ४०० धावा करणारा आजपर्यंतचा एकमेव खेळाडू ठरण्याचा मान वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्या नावावर आहे. सेंट जॉन्स येथील अँटिग्वा रिक्रिएशन ग्राउंडवर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चौथ्या व शेवटच्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
ब्रायन लाराने क्रिकेटच्या इतिहासात पाच शतके झळकवणारा एकमेव खेळाडू होण्याचा विक्रमही केला आहे. त्याने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डऱ्हॅमविरुद्ध वॉर्विकशायरच्या फलंदाजीच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली. ब्रायन लारा हा क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानला जातो. वेस्ट इंडिजच्या हा दिग्गज फलंदाज ४३० सामने खेळले आणि त्याने ४६.२८ च्या स्ट्राईक रेटने ५३ शतकांसह २२,३५८ धावा केल्या.
त्रिनिदादमध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने एप्रिल २००७ मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती घेतली.