जगभरातील अनेक बडे उद्योगपती, नेते, कलाकार आणि श्रीमंत लोक अनेकदा प्रायव्हेट जेटने प्रवास करतात. प्रायव्हेट जेटमधून प्रवास करण्याची एक वेगळीच मज्जा असते, यामधून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण त्यासाठी लाखोंच्या घरात पैसे मोजावे लागतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की, मी केवळ १३ हजार रुपयांमध्ये प्रायव्हेट जेटने प्रवास केला, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना. तुम्ही असे सांगणाऱ्या व्यक्तीलाच तुम्ही वेड्यात काढाल, बरोबर ना. पण ब्रिटनमधील एका व्यक्तीला खरचं १३ हजारांच्या विमान तिकीटात अगदी प्रायव्हेट जेटप्रमाणे प्रवास करण्याची संधी मिळाली आहे. या व्यक्तीने आपला मजेशीर किस्सा सोशल मीडियावर शेअर केला आहे.
१३ हजारांमध्ये घेतली प्रायव्हेट जेटची मजा
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील ६५ वर्षीय पॉल विल्किन्सन हा व्यक्ती आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नॉर्थ आयर्लंडहून पोर्तुगालला जात होता. यासाठी त्याने विमानाचे तिकीट घेतले. विमानतळावर पोहोचला आणि नंतर बोर्डिंगच्या ठिकाणी गेला, पण तिथले दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला, कारण तिथे त्याच्याशिवाय दुसरा-तिसरा कोणीही प्रवासी उपस्थित नव्हता. यावेळी पॉलला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले. त्याला वाटले, फ्लाइट रद्द झाली आहे किंवा कदाचित तो उशिरा पोहोचला आहे. या गोंधळात पॉलने बोर्डिंग कर्मचार्यांना विचारले असता त्यांनी दिलेले उत्तर ऐकून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.
कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले की, विमानात तो एकमेव प्रवासी आहे. यानंतर पॉलला बसमधून विमानाच्या दिशेने नेण्यात आले. तेथे केबिन क्रू मेंबर्सनी त्यांचे जोरदार स्वागत केले आणि त्यांना ‘किंग पॉल’ असे संबोधले. त्याला यावेळी आपल्यासोबत काही प्रँक होतोय असे वाटले, पण जेव्हा तो विमानात पोहोचला तेव्हा त्याला दिसले की, सर्व सीट खरोखरच रिकाम्या होत्या. टेकऑफ करण्यापूर्वी फ्लाइटच्या पायलटही त्याच्याशी बोलले आणि पायलटसह सर्व क्रू मेंबर्सनी त्याच्यासोबत फोटोही क्लिक केले.
छोट्या मांजरीने सापाला दिली एकच फाइट अन् वातावरण केले टाइट! पाहा मांजरीचा Viral Video
हा प्रवास त्याच्यासाठी अगदी प्रायव्हेट जेटमधून प्रवास करण्यासारखा होता. कारण विमानात कोणी प्रवासी नसल्याने त्याला त्यांच्या आवडीची जागा निवडण्याची आणि टेक ऑफ करण्यापूर्वी कॅप्टनशी बोलण्याचीही संधी मिळाली. पॉल विल्किन्सनच्या म्हणण्यानुसार, तो नशीबवान आहे, त्याला असा प्रवास करण्याचे भाग्य मिळाले, हा विमान प्रवास नेहमीच त्याच्या आठवणीत राहील.
पॉलच्या म्हणण्यानुसार, फ्लाइटनंतर त्याला सामान गोळा करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहण्याचीही गरज लागली नाही. त्याला अगदी प्रायव्हेट जेटमधून प्रवास केल्यासारखा अनुभव आला, यावेळी त्याला क्रूमेंबर्सकडून मिळालेला आदर पाहून तो भारावून गेला होता. विशेष म्हणजे पॉलने लँकेशायरहून पोर्तुगालला जाण्यासाठी केवळ १३० पौंड म्हणजेच सुमारे १३ हजार रुपयांचे तिकीट काढले होते, परंतु तरीही त्याने एक रॉयल प्रवास केला.