ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) हा विषय बराच ट्रेंडिंग आहे. अगदी थोडक्यात अर्थ सांगायचा तर तुमच्या बुद्धीचा कस लागेल अशी काही चित्र तुम्हाला दाखवली जातात, यामध्ये अमुक एक गोष्ट शोधण्यास सांगितली जाते. याचाच दुसरा प्रकार म्हणजे एकात एक गुंतलेलं चित्र दाखवलं जातं, यात तुम्हाला चित्रातील जी गोष्ट आधी दिसते त्यानुसार तुमचे व्यक्तिमत्व व स्वभाव दिसून येतो. अशीच एक शिल्पकृती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चोल स्थापत्यकलेचे उदाहरण असणारे हे ऑप्टिकल इल्युजन ९०० वर्ष जुने असल्याचे समजते
तामिळनाडूतील तंजावर येथील ऐरावतेश्वर मंदिरात जगातील सर्वात जुने ऑप्टिकल इल्युजन शिल्प आढळले आहे. १२ व्या शतकातील द्रविडीयन वास्तुकलेचा नमुना असलेल्या या शिल्पात, बैल व हत्ती एकत्र कोरले गेले आहेत. हिंदू धर्मात बैल आणि हत्तीला धार्मिक महत्त्व आहे. हत्ती किंवा ऐरावत हे इंद्राचे वाहन म्हणून पूजनीय आहे. बैल किंवा नंदी हे भगवान शिवाचे वाहन म्हणून पूजले जातात.
ऑप्टिकल इल्युजनमध्ये आपण पाहू शकता की बैलाची शिंग व हत्तीचे दात एकच दाखवण्यात आले आहेत तसेच या दोन्ही प्राण्यांचे डोके एकच आहे मात्र त्यातही दोन वेगळ्या बाजूंनी आपल्याला दोन्ही प्राणी स्पष्ट दिसू शकतात. यामध्ये तुम्हाला को प्राणी प्रथम दिसेल त्यानुसार तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू ओळखले जाऊ शकतात.
जर तुम्हाला बैल आधी दिसला तर..
बैल किंवा नंदी हे भगवान शिवाचे वाहन आहे. नंदीची गुणवैशिष्ट्य पाहिल्यास त्याला प्रामाणिक, विश्वासू, जिद्दी, सामर्थ्यशाली व सकारात्मक मानले जाते. ज्या व्यक्तींमध्ये हे गुण असतात त्यांना आधी बैल दिसू शकतो.
जर तुम्हाला हत्ती आधी दिसला तर..
हिंदू धर्मात हत्ती हा शांतता, दयाळूपणा, आदर, निष्ठा व बुद्धिमत्तेचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. इंद्राचे वाहन असलेला हत्ती हा देवी लक्ष्मीचे वाहन असल्याचेही सांगितले जाते. ज्या व्यक्तींना सर्वप्रथम हत्ती दिसून येतो ते दयाळू, विचारशील व समाजात आदराच्या स्थानी असल्याचे मानले जाते.
हिंदू धर्मात गाय, माकडे, साप, मासे आणि इतर अनेक प्राण्यांना धार्मिक महत्त्व आहे. म्हणूनच मंदिरे आणि इतर ऐतिहासिक ठिकाणांवरील विविध शिल्पांमध्ये हे प्राणी आढळून येतात. दगडाला आकार देणं हेच मुळात कसब! त्यात अशा प्रकारे आभास निर्माण करणारी शिल्पकृती साकारणे हे खरोखरच बारकाईने करायचे काम आहे यावरून आपल्या पूर्वजांच्या कलाकौशल्याचा अंदाज येतो.