उन्हाळ्यात प्रत्येकाला काहीतरी थंडगार खावंसं वाटतं. कारण- वाढत्या उकाड्यात थंडगार पदार्थ खाल्ल्यानं थोडं बरं वाटतं. त्यामुळे उन्हाळ्यात अनेकांच्या घरी बच्चे कंपनी असल्यास आइस्क्रीम खाण्याचे प्लॅन बनवले जातात. अगदी लहानांपासून मोठे लोकही आइस्क्रीम खाण्याचा आनंद घेतात. तुमच्या घराजवळच्या लहान दुकानांमध्ये चॉकलेट, व्हॅनिला, बटरस्कॉच अशा अनेक फ्लेवरचे आइस्क्रीम्स सहज मिळतात. त्यात ऑरेंज कँडी ही सर्वांची फेवरेट. अगदी १० रुपयांना मिळणारी ही कँडी लहान मुलं मिटक्या मारत खातात. त्यांच्या हातात कोणी पैसे दिले रे दिले की, आधी दुकान गाठून ते आइस्क्रीम घेतात. हल्ली त्यात खूप बदल झाले; पण तरी अनेकांना ही ऑरेंज कँडी आवडते. पण, ही कँडी फॅक्टरीमध्ये नेमकी कशी तयार होते, ते तुम्ही कधी पाहिले आहे का? जर कँडीनिर्मितीची ही प्रक्रिया तुम्ही पाहिली नसेल, तर खालील व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. मग तुम्ही पुन्हा स्वस्तात मिळणाऱ्या लोकल ब्रॅण्डच्या ऑरेंज कँडीला हात लावणार नाही. ऑरेंज कँडी फॅक्टरीमध्ये कशी बनवली जाते याचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
आजही ऑरेंज आइस्क्रीम अनेक ठिकाणी ५ ते १० रुपयांनी विकले जाते. ऑरेंज फ्लेवर अनेकांच्या आवडीचा असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, यात वापरण्यात आलेला रंग खरंच नैसर्गिक असतो का? कानपूरमधील स्थानिक आइस्क्रीम बनविणाऱ्या एका कारखान्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हे आइस्क्रीम खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा अन्नसुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती ऑरेंज आइस्क्रीम बनविताना दिसत आहे. तो प्रथम आइस्क्रीमच्या साच्यात एका बादलीत तयार केलेलं ऑरेंज सिरप ओततो. त्यानंतर त्यात दूध-साखरयुक्त आइस्क्रीमचे घट्ट मिश्रण टाकतो. मग फ्रिजरमध्ये हे आइस्क्रीम तयार होण्यासाठी ठेवले जाते. त्यानंतर ते एका टबमध्ये ठेवलं जातं. तो टब आणि त्यातील पाणी अतिशय घाणेरडं दिसत होतं. त्यातून आइस्क्रीम बाहेर काढून एका भांड्यात ठेवलं जातं आणि मग ते एका पॅकेटमध्ये टाकून पॅक केलं जातं. मात्र, संपूर्ण आइस्क्रीम बनविण्याच्या प्रक्रियेत स्वच्छतेची कोणतीही काळजी घेण्यात आलेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. मग असे हे आइस्क्रीम खाल्ल्यावर त्याचे आरोग्यावर नक्कीच वाईट परिणाम होतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
?आता हे आइस्क्रीम पुन्हा खाणार नसल्याच्या प्रतिक्रिया
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर humbhifoodie नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कानपूरमध्ये फक्त १० रुपयांमध्ये विकले जाणारे ऑरेंज आइस्क्रीम बनवले जात आहे. हा व्हिडीओ १० दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो लाखो वेळा पाहिला गेला; तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही जण स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत; तर काही जण त्यावर विनोदी कमेंट्स करीत आहेत.
एका युजरने लिहिले की, आजनंतर मी लोकल आइस्क्रीम कधीच खाणार नाही. दुसऱ्याने लिहिले की, लहानपणी येथे खाल्ल्याने माझी प्रतिकारशक्ती मजबूत झाली आहे. तिसऱ्या युजरने लिहिले की, हे आइस्क्रीम गटारीच्या पाण्यापासून बनते, हे पालकांचे म्हणणे बरोबर आहे. चौथ्याने लिहिले की, अजिबात स्वच्छता पाळण्यात आलेली नाही.