95th Academy Awards 2023: चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. ऑस्कर २०२३ साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे.‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. भारताला पहिल्यांदाच नाटू नाटू मुळे या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे.
‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर मिळाल्यावर संगीतकार एम एम कीरावनी यांनी या जगात गाजलेल्या तेलगू भाषेतील गाण्याचा खरा अर्थ व त्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली हे सांगितले आहे. अकादमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर कीरावनी व गीतकार चंद्रबोस बोलत होते.
एम एम कीरावनी सांगतात की, ‘नाटू नाटू’ हे भारतीय चित्रपटाचं व दक्षिणात्य संगीताचं शुद्ध व मूळ रूप दर्शवणारं गाणं आहे. याला एका प्रकारचा रस्टिक लुक आहे. तर गाण्याची प्रेरणा कुठून मिळाली हे सांगताना चंद्रबोस यांनी हे सर्व आपल्या गावी आलेल्या अनुभवाचे प्रतीक असल्याचे म्हंटले आहे.
नाटु नाटु’ गाण्याचा मराठी अर्थ (RRR Naatu Naatu Meaning)
‘नाटू नाटू’ गाण्याचा मराठीत अर्थ पाहायचं तर हे एक अगदी सोप्या संदर्भाचं गाणं आहे, मुळात नाटु या शब्दाचा अर्थ होतो डान्स. या गाण्यात चला सगळे मिळून नाचूया असे म्हणत सुरुवात केली आहे आणि मग सर्व कडव्यांमध्ये नाचण्यात कशी ऊर्जा हवी हे सांगितले आहे.
- गाण्याच्या सुरुवातीचे शब्द म्हणजे ना पाटा सोडू याचा अर्थ म्हणजे माझं गाणं ऐका आणि नाचायला या.
- पहिल्या कडव्यात तुम्ही प्राणीपक्षी जसे बिनधास्त आकाशात झेप घेतात तसे नाचा असे म्हंटले आहे.
- दुसऱ्या कडव्यात ढोल व ताशांच्या गजरात एकरूप होऊन नाचा असे म्हंटले आहे
- तर तिसऱ्या कडव्यात तुम्ही असे नाचा की पृथ्वीवरची धूळ आकाशापर्यंत पोहोचली पाहिजे असे म्हंटले आहे.
आरआरआर या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने आज प्रत्येक भारतीयाची सकाळ अशीच उर्जावान केलेली आहे.