एका सीसीटीव्ही कंपनीची ‘उपर वाला सब देख राहा है!’ ही जाहिरात आठवते का ? दुकानात सीसीटीव्ही बसवले तर चोरी होणार नाही असा युक्तीवाद पुढे करत या कंपनीने आपल्या उत्पादनाची जाहिरात केली होती. आता दुकानात कितीही सीसीटीव्ही असले तरी चोरी व्हायची ती होतेच. चोरीचे असे असंख्य सीसीटीव्ही फुटेज अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात. चोर वेगवेगळ्या क्लूप्त्या लढवत पैशांची किंवा मौल्यवान सामानांची चोरी करतात हे बरेचदा आपण पाहतो. त्यामुळे नेहमी दुकान मालकाला सतर्क राहण्यास अनेकदा पोलिसांकडून सांगितले जाते. पण असे असले तरी काही वेळा मात्र दुकानदार फसतातच. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ याचे उदाहरण आहे. वृद्ध दुकानदाराच्या अगदी डोळ्यासमोरून पैशांचे बंडल चोर गायब करतात आणि मालकाला कळत देखील नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पंजाबमधल्या लुधियाना येथील आहे. दोन तरूण खरेदी करण्याच्या निमित्ताने कपड्यांच्या दुकानात शिरतात. दुकान मालकाला पैसेही देतात जसे सुट्टे पैसे देण्यासाठी मालक आपले पैशाचे कपाट उघडतो तसे काहीतरी घेण्याचे निमित्त करत यातला एक तरूण अगदी डोळ्यासमोरून पैशाचे बंडल काढून घेतो. दुर्दैव म्हणजे चोरी होऊनही या वृद्ध दुकानदाराला मात्र ते समजत नाही. अशा प्रकारच्या अनेक ट्रिक्स वापरून चोर चोरी करतात त्यामुळे तुम्ही देखील सतर्क राहून दुकानातील मौल्यवान वस्तूंची आणि पैशांची काळजी घ्या.