भारताच्या ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विटरवर सर्वाधिक ट्विट्चा विक्रम पार पडला आहे. यानिमित्तानं देशभरातून प्रजासत्ताक दिनानिमित्त वेगवेगळे हॅशटॅग वापरून जवळपास ११ लाख ट्विट् भारतीय ट्विपल्सकडून करण्यात आल्याचं ट्विटरनं सांगितलं आहे. गेल्यावर्षांच्या तुलनेत ट्विट्सचा आकडा हा दीड लाखांहून अधिक वाढला आहे. गेल्यावर्षी शुभेच्छा किंवा प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती देणारे एकूण ९ लाख ट्विट करण्यात आले होते. यावर्षी हा आकडा ११ लाखांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भारतानं गेल्यावर्षीचा आपला रेकॉर्ड मोडला आहे.

या प्रजासत्ताक दिनाला भारतानं आसिआन देशातील १० राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाला दोन पेक्षा अधिक देशांच्या राष्ट्रप्रमुखांना पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या लष्करी सामर्थ्यांचं दर्शन घडवणारा हा दिमाखदार सोहळा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पार पडला. यानिमित्तानं देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव ट्विटच्या माध्यमातून केला गेला. इतकंच नाही तर गुगलनंदेखील खास डुडल तयार करत वैविधतेनं नटलेल्या भारताचं दर्शन घडवलं.

ट्विटरनंदेखील ६९ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खास इमोजी आणले होते. #HappyRepublicDay, #RepublicDay, #RepublicDay2018 असे हॅशटॅग वापरल्यावर त्यासोबत इंडिया गेटचा इमोजी दिसत होता. ट्विटरची ही कल्पना सर्वांनाच खूप आवडली होती. इतकंच नाही तर संपूर्ण जगभरातील ट्विटर ट्रेंडमध्येदेखील भारताचा प्रजासत्ताक दिन हा ट्रेंडमध्ये होता.

Story img Loader