‘भारत पे’चे माजी एमडी आणि ‘शार्क टँक इंडिया’च्या माध्यमातून देशभरामध्ये लोकप्रिय झालेल्या अशनीर ग्रोव्हर सध्या त्यांच्या पुस्तकामुळे चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या कंपनीमधील आर्थिक गोंधळामुळे चर्चेत असलेले ग्रोव्हर हे सध्या त्यांच्या ‘दोगलापन’ या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत. या पुस्तकामध्येच त्यांनी मागील वर्षी झोमॅटोच्या लिस्टिंगमध्ये आठ मिनिटांमध्ये २ कोटी २५ लाखांची कमाई केल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये झोमॅटो आयपीओसाठी १०० कोटींचा निधी वापरण्याचा अर्ज केला होता. या अर्जामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. ग्रोव्हर यांनी एवढी मोठी रक्कम कशी जमवली यासंदर्भातील चर्चांना उधाण आलं होतं.
पुस्तकामध्ये अनशीर ग्रोव्हर यांनी दिलेल्या माहितीनुसार १०० कोटींच्या शेअर्ससाठी अर्ज करताना पाच कोटी रुपये स्वत:च्या खिशातून टाकले होते. तर ‘कोटक वेल्थ’च्या मदतीने त्यांनी ९५ कोटींचा निधी उभा केला होता. त्यांनी हा निधी १० टक्के व्याजाने घेतला होता. एका आठवड्यासाठीच हा निधी गोव्हर यांनी वापरला. त्यांनी शेअर्स घेण्यासाठी व्याजाच्या माध्यमातून प्रत्यक्षात २० लाख रुपये घेतले होते. आपल्या पुस्तकामध्ये या खरेदीसंदर्भात सांगताना ग्रोव्हर यांनी, “आयपीओ तीनपटींहून अधिक सबक्राइब झाला. त्यामुळे मला तीन कोटींहून अधिक शेअर्स मिळाले,” असं म्हटलं आहे.
२०२१ मध्ये २३ जुलै रोजी शेअर एक्सचेंजमध्ये ७६ रुपये प्रति शेअर इश्यू प्राइजच्या तुलनेत ११५ रुपये प्रति शेअर दराने बाजारात विकले जात होते. त्याचवेळेस ग्रोव्हर यांनी आपल्या वेल्थ मॅनेजरला शेअर्स विकण्याचे निर्देश दिले. आपल्या पुस्तकामध्ये त्यांनी आपण ७६ रुपयांना घेतलेले हे शेअर्स १३६ रुपयाला विकले. अशाप्रकारे आठ मिनिटांमध्ये २.२५ कोटी रुपये कमवल्याचं ग्रोव्हर यांनी म्हटलं आहे.
आपल्याला झोमॅटोच्या शेअर्समधून नफा होईल याचा अंदाज होता असंही गोव्हर यांनी म्हटलंय. ‘मी दिपेंदरला ओळखत होतो. तो मोठं काहीतरी करणार याचा अंदाज आपल्याला होता. करोनाच्या लाटेनंतर झोमॅटोच्या ऑर्डर्सची संख्या वाढली आणि त्याचा फायदा कंपनीला झाला,’ असं अशनीर यांनी पुस्तकात म्हटलंय. अशनीर यांनी आयआयएम अहमदाबाद आणि आयआयटी दिल्लीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.