सामान्यपणे कोणतीही कंपनी ग्राहकांच्या सुविधेला प्राधान्य देत त्यांच्या सोयीचा विचार करते. ग्राहकांच्या आवडी-निवडीनुसार अनेक कंपन्या आपले महत्वाचे निर्णय घेतात. मात्र चीनमध्ये या अलिखित नियमाविरुद्ध घटना समोर आली आहे. चीनमधील एका खाजगी कंपनीच्या मालकाने त्याच्या वेबासाईटवर नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्या एका महिला ग्राहकाला भररस्त्यात मारहाण केली. विशेष म्हणजे या महिलेला मारण्यासाठी कंपनीच्या मलकाने चक्क ८०० किलोमीटरचा प्रवास केला. पोलिसांनी या घडलेल्या घटनेला दुजोरा दिला असला तरी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसही या विचित्र अशा गुन्ह्यामुळे चक्रावून गेले असून त्यांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. ऑर्डर केलेले सामान नियोजित वेळी न आल्याबद्दल या महिलेने वेबसाईटवर प्रतिक्रिया देऊन नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
मारहाणीचा प्रकार घडला त्या रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये या संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. ज्या महिलेला मारहाण झाली तिचे नाव शियाओ ली असे आहे. पूर्व चीनच्या झेंगझाऊ प्रांतात राहणाऱ्या शियाओने एका ऑनलाइन रीटेल कंपनीकडून काही सामान मागवले होते. मात्र नियोजित वेळेनंतरही हे सामान शियाओपर्यंत न पोहचल्याने ती नाराज झाली. अखेर चार दिवसांनंतर तिला ते सामान मिळाले. शियाओने यासंर्भात कंपनीकडे तक्रार केली. या तक्रारीमुळे कंपनीचा मालक असणारा झांग सुझोऊ संतापला. या महिलेला धडा शिवकण्याच्या उद्देशाने तो शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन झेंगझाऊमध्ये दाखल झाला. शियाओ रस्त्यावरून जात असताना अचानक या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. एका मागोमाग एक अनेक वेळा तिला फटके मारण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्लामुळे शियाओ जमिनीवर पडली. त्यानंतरही झांग थांबला नाही. त्याने तिला लाथांनी मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात शियाओ गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आले आहे. झांग याने मला मेसेज करुन धडा शिकवण्याची धमकी दिली होती असा दावा जखमी शियाओने केला आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केवळ शियाओला मारण्यासाठी झांगने रात्रभर प्रवास केला. या प्रकरणात हल्लेखोर झांगवर काय कारवाई करण्यात आली या संदर्भात कोणतीही माहिती हाती आलेली नाही. मात्र चीनमध्ये वाढत असणाऱ्या ऑनलाइन मार्केटप्लेसवरून होणाऱ्या वादाचे असे रुप जगाने पहिल्यांदाच पाहिले आहे.
पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ