Pahalgam Terror Attack video: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी २२ एप्रिल, २०२५ रोजी पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सय्यद आदिल शाह या २० वर्षांचा काश्मिरी तरुणाचा देखील मृत्यू झाला. दहशतवाद्यांपासून पर्यटकांचं संरक्षण करताना सय्यदनं जीव गमावला. माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. अशा अनेक स्थानिक लोकांनी तेव्हा पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अशातच एका लहान काश्मीरी मुलानंही मोठं धाडस दाखवत पर्यटकाच्या चिमुकल्या बाळाला वाचवलं आहे. बाळाला हातात घेऊन पळतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. तर माणुसकीचं जिवंत उदाहरणही पाहायला मिळेल.

पहलगामच्या या व्हिडिओमध्ये काही लोक घाबरलेले दिसत आहेत, तर एक काश्मिरी मुलगा त्यांच्या मागे एका मुलासह चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ हल्ल्यानंतरचा असल्याचं सांगितलं जात आहे. मागून गोळीबाराचे आवाज येत आहेत. तो काश्मिरी मुलगा हात वर करून म्हणतो, “मी येतोय, काळजी करू नका.”व्हिडिओमध्ये, एक महिला ओरडत असल्याचं ऐकू येतं, जी पूर्णपणे घाबरलेली आहे. हा व्हिडीओ खूप शेअर केला जात आहे, लोक या मुलाचं भरभरून कौतुक करत आहेत.या व्हिडिओतून माणूसकी अजूनही जिंवत असल्याचे दिसून येते.

वाचलेल्या पर्यटकांनी सांगितली आपबिती!

या हल्ल्यातून बचावलेल्या पर्यटकांनी तपास पथकाला घडलेला प्रकार सांगितला. “तिथे चार माणसं लष्कराच्या वेषात आली. बाजूच्या घनदाट जंगलातून ते बाहेर आले. त्यांनी आल्यावर आमची नावं विचारली. आम्हाला वाटलं ते सुरक्षा अधिकारी आहेत. पण अचानक त्यांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी पुरुषांना प्रामुख्याने लक्ष्य केलं होतं. महिलांना त्यांनी सोडून दिलं होतं. काही पुरुषांना तर त्यांनी अगदी जवळून गोळ्या घातल्या”, असं एका महिला पर्यटकानं सांगितल्याचं तपास अधिकाऱ्यांनी नमूद केलं.

पाहा व्हिडीओ

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Kaakazkyom या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच अनेकांनी त्या लहान मुलाचे कौतुक केले आहे. हल्ल्यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेकांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.