Pahalgam Terror Attack Updates in Marathi : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू काश्मीमध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याने संपूर्ण देश हादरला आहे. देशात ठिकठिकाणी आंदोलनाद्वारे पाकिस्तानविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यात अनेक लोकांनी आपला जीव गमावला. यापैकी एक होते शैलेश कलाथिया. शैलेश कलाथिया यांच्या पत्नीने माध्यमाशी बोलताना घडलेल्या घटनेविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. त्यांनी सांगितले की दहशतवादी त्यांच्या नवऱ्याला गोळी मारल्यानंतर हसत होता.

“माझ्या नवऱ्याला गोळी मारल्यानंतर दहशतवादी हसत होता.” ( “Terrorist Was Laughing After Shooting My Husband” )

शैलेश कलाथिया यांच्या पत्नी शीतल कलाथियाने घडलेल्या घटनेविषयी सांगितले, “एक दहशतवादी आधी आमच्या जवळ आणि आणि नंतर आम्ही हिंदू असल्याचे कळताच त्याने माझ्या नवऱ्याला गोळी मारली. माझ्या नवऱ्याबरोबर त्याने इतर हिंदू पुरुषांना सुद्धा त्यांच्या मुलाबाळांसमोर गोळी मारली. माझ्या नवऱ्याला गोळी मारल्यानंतर दहशतवादी हसत होता. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला नाही, तोपर्यत तो तिथेच होता.

“ज्यांनी ‘कलमा’ वाचल्या, त्यांना सोडले पण जे वाचू शकले नाही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.”

गुजरातमधील सुरत येथे राहणारे ४४ वर्षीय शैलेश भाई हिम्मत भाई कलाथिया मुंबईतील एसबीआयच्या शाखेत ब्रँच मॅनेजर म्हणून कार्यरत होते. ते त्यांच्या पत्नी शीतल, मुलगा नक्श आणि मुलगी नीतिसह काश्मीर येथे पहलगामला सुट्ट्याचा आनंद लुटण्यासाठी गेले होते पण या दहशतवादी हल्ल्यात त्यांची दुर्दैवाने मृत्यू झाला.

शैलेश यांचा मुलगा नक्शने सांगितले, ” आम्ही जसा गोळ्यांचा आवाज ऐकला, सर्व पर्यटक पहलगाममध्ये लपण्यासाठी धावत होते पण दोन दहशतवाद्यांनी आम्हाला पकडले आणि आम्हाला आमचा धर्म विचारला. त्यांनी लोकांना हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समुहामध्ये विभागले. हिंदूना मुस्लीम लोकांपासून वेगळे केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना ‘कलमा’ वाचण्यास सांगितले. ज्यांनी ‘कलमा’ वाचल्या, त्यांना सोडले पण जे वाचू शकले नाही त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.”