Shailesh Kalathiya’s Wife On Government Security : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पर्यटनासाठी जम्मू काश्मीमध्ये गेलेल्या निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात वातावरण चांगलचं तापलं आहे. सोशल मिडिया मृतकांच्या कुटुंबियांचे, संतप्त नागरिकांचे व्हिडीओ समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये ते घटनेविषयी रोष व्यक्त करत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मृतक शैलेश कलाथिया यांच्या पत्नीने सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. त्या काय म्हणाल्या, जाणून घेऊ या.

हल्ल्यात जीव गमावलेल्या मृतक शैलेश कलाथिया यांच्या पत्नीने सरकारवर केली टीका

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात गुजरातमधील सुरत येथे राहणारे ४४ वर्षीय शैलेश भाई हिम्मत भाई कलाथिया यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बरोबर त्यांची मुले आणि पत्नी सुद्धा होत्या पण सुदैवाने ते सुरक्षित आहे. सध्या त्यांच्या पत्नीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्या म्हणतात, “काश्मीर खराब नव्हता, सरकारची सिक्योरिटी खराब होती. मिनी स्विझिलँडमध्ये एक सुद्धा अधिकारी नव्हता. एकही जवान नव्हता. जर ते असते तर असे झाले नसते. कोणतीही सिक्योरिटी नाही. खाली असलेल्या आर्मीच्या लोकांना माहिती नव्हते की वरती पहलगाममध्ये काय घडले.” सरकारची सिक्योरिटी खराब असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

vinodkapri या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवरअनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सिक्योरिटी का नव्हती, हे विचारतोय भारत” तर एका युजरने लिहिलेय, “जर काश्मीर खराब नसेल तर सिक्योरिटी का पाहिजे?” आणखी एका युजरने लिहिलेय, “किती हजार वर्षांपर्यंत सिक्योरिटी द्यावी?” अनेक युजर्सनी सरकार विरोधात रोष व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.