गुरुवार २७ ऑक्टोबरला, अवघ्या एका धावेने झिम्बाबेने पाकिस्तानचा पराभव करत यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील एका धक्कादायक निकालाची नोंद केली. पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये अवघ्या १३१ धावांचं लक्ष्यही पूर्ण करता आलं नाही. निर्धारित २० षटकांमध्ये पाकिस्तानला केवळ १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानचा हा ‘सुपर १२’ फेरीतील सलग दुसरा पराभव होता. यानंतर त्यांची उपांत्यफेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता कमी आहे. झिम्बाब्वेसारख्या दुबळ्या संघाकडून पराभूत झाल्याने पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिम्बाब्वेच्या विजयानंतर सोशल मीडियावर मिस्टर बीन ट्रेंड होताना दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मिस्टर बीन ब्रिटनचा नसून पाकिस्तानचा बनावट मिस्टर बीन होता. इतकंच नाही तर झिम्बाब्वेचे राष्ट्रपतींनीही यासंबंधी एक ट्वीट केले आहे. मात्र अनेकांना हे नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल काहीच कल्पना नाही. हा बनावट मिस्टर बीन कोण आहे आणि त्यावरून पाकिस्तानला का ट्रोल केलं जात आहे? पाहुयात.

पार्थच्या मैदानावर झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर देशाचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो मनंगाग्वा यांनी ट्वीटरवरुन आनंद तर व्यक्त केलाच, पण त्याचबरोबर त्यांनी खोचक शब्दांमध्ये पाकिस्तानला डिवचलं. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “झिम्बाब्वेला फारच भन्नाट विजय मिळला! संपूर्ण संघाचं अभिनंदन. पुढील वेळेस खरा मीस्टर बीन पाठवा…” असं मनंगाग्वा यांनी ट्वीटमध्ये म्हटलं. पाकिस्तानने यापुढे तरी खरा मिस्टर बीन पाठवावा अशी अपेक्षा यावेळी मनंगाग्वा यांनी व्यक्त केली. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे हा हॅशटॅगही वापरला. यानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही पाकिस्तानला ट्रोल केले.

फटाक्याची वात पेटवून पळताना भाजपाचा आमदार तोंडावरच पडला; Video Viral

काय आहे ‘पाकिस्तानी बीन’ प्रकरण?

पाकिस्तानी संघ झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यासाठी तयारी करत असल्याचे फोटो २५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच भारताकडून पराभूत झाल्याच्या दोन दिवसांनंतर पोस्ट करण्यात आले होते. यावर निगुगी चासुरा या झिम्बाब्वेच्या चाहत्याने रिप्लाय केला होता. तो म्हणाला, “आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. एकदा तुम्ही आम्हाला मिस्टर बीन रोवॅनऐवजी खोटा मिस्टर बीन दिला होता. उद्या तुम्हाला पराभूत करुन आम्ही याचा बदला घेणार आहोत. पाऊस पडणार नाही यासाठी प्रार्थना करा.”

ब्रिटनचे रोवन ऍटकिन्सन न बोलताही लोकांना हसवणारा मिस्टर बीन या नावाने प्रसिद्ध आहेत. २०१६ साली हरारे येथे एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानने एका कलाकाराला बनावट मिस्टर बीन बनवून पाठवले होते. आसिफ मुहम्मद असे त्या कलाकाराचे नाव असून ते पाकिस्तानमध्ये मिस्टर बीनची भूमिका करून आपला उदरनिर्वाह करतात. असिफ यांची ओळख ‘पाक बीन’ अशी आहे. या झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये केवळ मिस्टर बीनप्रमाणे दिसतो या एका कारणासाठी असिफ यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. या फसवणुकीचा बदला घेण्यासाठी झिम्बाब्वेचे चाहते २०१६ पासून वाट पाहत होते. अखेरीस पाकिस्तानला पराभूत करून झिम्बाब्वेने झालेल्या फसवणुकीचा बदला घेतला आहे.

झिम्बाम्बेने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावत १३० धावा केल्या होत्या. छोटं आव्हान असतानाही झिम्बाम्बेने पहिल्या चेंडूपासून पाकिस्तानला कडवी झुंज दिली. शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी तीन धावांची गरज होती. मात्र पाकिस्तानला दोनच धावा मिळाल्या आणि झिम्बाम्बेने हा सामना जिंकला. या पराभवानंतर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेरही पडण्याची शक्यता आहे. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील, त्याचबरोबर इतर संघांचा निकालही त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak bean trending on twitter after zimbabwe beat pakistan president emmerson dambudzo mnangagwa world cup t20 pvp
Show comments