काश्मीर प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साप आणि मगरींच्या मदतीने हल्ला करण्याची धमकी एका पाकिस्तानी गायिकेने काही दिवसांपूर्वी दिली होती. राबी परिजाद असे या गायिकेचे नाव असून तिला ही धमकी देणं खूपच महागात पडलं आहे. ट्रोल होण्याबरोबरच आता राबीला बेकायदेशीररित्या घरात साप ठेवल्याप्रकरणी दंड भरण्याचे आदेश वन्यजीव विभागाने दिल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तसेच या प्रकरणात दोषी अढळल्यास राबीला पाच वर्षाचा तुरुंगवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राबीने आपल्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये तिने काश्मीर प्रश्नावरुन चिंता व्यक्त केली होती. मात्र ती बोलत असतानाच तिच्या हातात साप असल्याचे व्हिडिओत दिसत होते. तसेच ती उभी असलेल्या टेबलवर अनेक साप आणि मगरी पडलेल्या दिसत होत्या. ‘हे साप आणि मगरी म्हणजे पंतप्रधान मोदींसाठी माझ्याकडून दिलेली भेट आहे. हे सर्व तुमच्यावर ताव मारतील,’ अशी विचित्र धमकी राबीने या व्हिडिओमधून दिले होती. हा व्हिडिओ बराच व्हायरल झाला. अनेकांनी राबीला या व्हिडिओवरुन ट्रोल केले.
हे प्रकरण शांत होत असतानाच आता वन्यजीव विभागाने या व्हिडिओची दखल घेत या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात राबी दोषी अढळल्यास तिला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि मोठा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. मात्र हे प्राणी मी पाळलेले किंवा घरात ठेवलेले नसून ते मी व्हिडिओ शूट करण्यासाठी भाडेतत्वावर आणले होते असं राबीने दुसऱ्या एका व्हिडिओमदून स्पष्ट केले आहे. कारवाईची बातमी समोर आल्यानंतर घाबरलेल्या राबीने दुसरा एक व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. ‘मागील पाच वर्षांमध्ये मी अनेक वृत्तवाहिन्यांवर साप घेऊन उपस्थित राहिले आहे. त्यावेळी माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पण दुर्देवाने आता मी मोदींना इशारा दिला तर माझ्यावर कावराई केली जात आहे,’ असं राबी या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे. या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे समजल्यानंतर तीने कोणाचेही नाव न घेता ‘पाकिस्तानमधील देशद्रोही लोकांपेक्षा भारतीय खूप चांगले आहेत’ असं मत व्यक्त केलं आहे. ‘पाकिस्तानमधील वन्यजीव विभाग हा देशद्रोही आहे. मी कधीच भारतीयांवर टीका केली नाही. मी केवळ मोदींवर टीका केली. जर तुम्ही पाकिस्तानवर प्रेम करु शकत नाही तर किमान देशाला फसवू तरी नका,’ अशा शब्दांमध्ये राबीने वन्यजीव विभागावर टीका केली.