पाकिस्तानमधील एका न्यूज अँकरचा व्हिडिओ लांगलाच व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील मुलाखतीदरम्यान अँकरला चांगलेच हसू फुटले जेव्हा मुलाखतकाराने देशातील विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करताना भारत आणि पाकिस्तानमध्ये पिकवलेल्या केळीची तुलना करण्यास सुरुवात केली. या मुलाखतीची एक छोटी क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण, सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतनेही ट्विट केले आहे. हा पाकिस्तानातील एक उर्दू न्यूज चॅनल न्यूज वनचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये अल्वीना आगा अँकर आहे आणि एक तज्ज्ञ तिला केळीबद्दल समजावून सांगत आहे.
व्हिडिओमध्ये एक तज्ज्ञ व्यक्ती स्पष्ट करते की, “इथल्या लोकांनी ( पाकिस्तानच्या) थोडा खर्च करायला हवा, संशोधन करायला हवे. मुंबईची केळी खूप मोठी-मोठी आहे, जर एका खोलीत ६ केळी असल्या तर त्याचा सुगंध दरवळतो. त्याचप्रमाणे, ढाका येथील केळी ही एक लांब केळी आहे.” यादरम्यान तो व्यक्ती हातवारे देखील करत होता. मुंबई आणि बांगलादेशची राजधानी ढाका येथे किती मोठी केळी आहे याची लांबीही सांगत होता. संशोधन करून अशी केळी पाकिस्तानातही पिकवावीत, असे तो म्हणाला.
त्या व्यक्तीचे हे वक्तव्य ऐकून अँकर अल्विना आगा यांना हसू आवरता आले नाही. काही वेळ ती डोकं टेकवून हसत राहिली, त्यानंतर तिने हाताने त्या व्यक्तीकडे इशारा केला. हसत हसत ती म्हणाली की, पाकिस्तानमध्ये विकास फार कमी आहे आणि इथे जास्त विकासाची गरज आहे. तुम्ही तुमचं बोलणं पूर्ण करा. यानंतर पाहुणे तज्ज्ञ म्हणाले, “संशोधन करून पाकिस्तानात अशा पद्धतींचा अवलंब केल्यास येथील केळीचा आकारही वाढेल आणि उत्पादनही वाढेल.”
नायला इनायतने हा व्हिडीओ ट्विट केला आणि लिहिले, “आणि मुंबई जिंकली.” लोक म्हणाले की ते फक्त मनोरंजनासाठी पाकिस्तानचे न्यूज चॅनेल पाहतात. एका व्यक्तीने सांगितले की, ‘काका’ हे बरोबर समजावून सांगत होते, पण अँकरने ते चुकीचे ठरवले. काही लोकांनी अँकर अल्विना आगाला ‘अनप्रोफेशनल’ म्हटले. काहींनी त्याला ‘आफ्रिकेतील केळी’ बद्दल बोलावे आणि मग निर्णय घ्यावा असे सुचवले. व्हिडिओमध्ये एक वेळ तर अशी येते जेव्हा दोघेही हसत असतात.