Pakistan PM Shehbaz Sharif Snatched Umbrella From Woman, Viral Video: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे सध्या पॅरीस दौऱ्यावर आहेत. येथे जागतिक वित्तपुरवठा कराराबाबत दोन दिवसीय शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात कर्ज वाटप करण्याची मुदत संपणार आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्या देशाला आर्थिक मदत मिळवी, यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून शाहबाज शरीफ या दोन दिवसीय शिखर परिषदेला उपस्थित राहिले आहेत.
या परिषदेत शाहबाज शरीफ हे सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अझीझ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यासारख्या जागतिक नेत्यांची भेट घेतील. असं असताना शाहबाज शरीफ यांचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे पॅरीस शिखर परिषदेसाठी पलाइस ब्रॉन्गनियार्ट येथे आल्याचं दिसत आहे. यावेळी मुसळधार पाऊस सुरू असताना शरीफ यांनी एका महिला कर्मचाऱ्याची छत्री हिसकावली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, शाहबाज शरीफ जेव्हा पॅरिस शिखर परिषदेसाठी बैठकीच्या स्थळी पोहोचले. तेव्हा बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. या पावसात एक महिला कर्मचारी शरीफ यांना घेण्यासाठी छत्री घेऊन आली. तेव्हा शरीफ यांनी भरपावसात महिला कर्मचाऱ्याच्या हातातून छत्री हिसकावून घेतली. त्यांनी छत्री घेऊन स्वत:चा बचाव केला आणि संबंधित महिला कर्मचाऱ्याला तसेच पावसात सोडलं.
पंतप्रधान शरीफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.पाकिस्तानी सोशल मीडिया वापरकर्ते त्यांच्या पंतप्रधानांच्या या असभ्य वर्तनावर संतापले आहेत. पंतप्रधान शरीफ यांनी त्या महिलेला पावसात का सोडलं? अशा कार्टुनला कुणी पाकिस्तानचा पंतप्रधान बनवलं, अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे.