जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यानंतर पाकिस्तानकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान इतका बिथरला आहे की पाकिस्तानने भारताला अणू हल्ल्याची धमकी दिली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरही उचलला आहे. परंतु पाकिस्तानने दिलेल्या अणू हल्ल्याच्या धमक्यांनंतर पाकिस्तानातील एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जे पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
पाकिस्तानमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस कर्मचारी सायकलवरून गस्त घालताना दिसत आहे. प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार तारेक फतेह यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ‘इकॉनॉमी ड्राईव्हवर पाकिस्तानी पोलीस’ असं त्यांनी या व्हिडीओला नाव दिलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ कधी काढण्यात आलाय याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. परंतु या व्हिडीओनंतर पाकिस्तानातील आर्थिक परिस्थितीचा अंदाज मात्र घेता येऊ शकतो. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मात्र अनेकांनी पाकिस्तानला ट्रोल करण्यास सुरू केले आहे.
Pakistani cops on economy drive! pic.twitter.com/brwgvl0u1e
— Tarek Fatah (@TarekFatah) August 29, 2019
एकीकडे अणू युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानमध्ये आपल्या देशातील अंतर्गत परिस्थितीचा विसर पडताना दिसत आहे. यातच गुरूवारी पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाईल गझनवीचे परीक्षण केले. त्यातच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद हेदेखील भारताला युद्धाची धमकी देत आहेत. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील देशाला संबोधित करताना भारताशी अखेरच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडे आपल्या कार्यालयाचे वीज बिल भरण्यासाठीही पैसे नसल्याचे समोर आले होते. तसेच बिल न भरल्यास त्यांच्या कार्यालयाची वीज कापणार असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.