बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरचा डायलॉग बोलणं एका पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे. या पोलीस अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील पाकपतान येथील कल्याणा पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक अर्शद यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत अर्शद अनिल कपूरच्या ‘शूटआऊट अॅट वडाळा’ चित्रपटातील ‘दो वक्त की रोटी खाता हूं, पांच वक्त की नमाज पढता हूं…इससे ज्यादा मेरी जरुरत नही और मुझे खरीदने की तेरी औकात नही’, हा डायलॉग बोलताना दिसत आहे.
अर्शद यांचा व्हिडीओ व्हायरल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नजर त्याच्यावर पडली. यानंतर पाकपतानचे जिल्हा पोलीस अधिकारी मारिक महमूद यांनी लगेचच अर्शद यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. याप्रकरणी चौकशी समितीही नेमण्यात आली आहे.
याआधीही पाकिस्तानमधून अशीच एक बातमी आली होती. त्यावेळी पाकिस्तान विमानतळ सुरक्षा दल म्हणजेच एएसएफने आपल्या एका महिला कर्मचाऱ्याला निलंबित केलं होतं कारण ती एक भारतीय गाणं गात होती. त्या महिलेचाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.