बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ या स्पर्धेनंतर झालेल्या फोटोसेशन दरम्यान पाकिस्तानाच्या संघाने चक्क भारतीय तिरंगा हातात घेऊन फोटो काढला आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच आता सोशल मीडियावर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

बुडापेस्ट येथे यंदाची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात सहभागी सर्वच संघ उपस्थित होते. यावेळी भारत आणि पाकिस्तान संघाने फोटो सेशनही केलं. मात्र, यावेळी पाकिस्तानच्या संघाचे चक्क भारतीय तिरंगा हातात घेऊन फोटो काढल्याने हा चर्चेचा विषय ठरला. त्यानंतर याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध असताना खेळ भावना सर्वोच्च असल्याची प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा – Chess Olympiad 2024: भारताने ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जिंकले सुवर्णपदक, चेस ऑलिम्पियाडमध्ये डी गुकेशची चमकदार कामगिरी

महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी संघाकडून दुसऱ्या कोणत्या देशाचा ध्वज हातात घेऊन फोटो काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानच्या हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान अंतिम सामन्यात चीनला समर्थन देण्यासाठी चीनचा ध्वज हातात घेऊन फोटो काढले होते. त्यावेळीही पाकिस्तानच्या संघाचं कौतुक झालं होतं.

दरम्यान, यंदाच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये खुल्या विभागात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्या सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं. भारतीय संघात गुकेश डी, आर प्रज्ञानंद, अर्जुन इरिगसी, विदित गुजराथी, पेंटाला हरिकृष्ण आणि श्रीनाथ नारायणन यांचा समावेश होता. अर्जुन इरिगसी आणि डी गुकेश यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनला यूएसए विरुद्ध दोन गुणांचा फटका बसल्यानंतर भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित झाले होतं.

हेही वाचा – Chess Olympiad 2024: गुकेश-तानियाने चेस ऑलिम्पियाड ट्रॉफीसह रोहित शर्मा स्टाईलमध्ये केलं सेलिब्रेशन, भारतीय बुद्धिबळ संघाचा VIDEO होतोय व्हायरल

खरं तर भारतीय संघाने स्पर्धेची स्वप्नवत सुरुवात केली होती. गेल्या सीझनमध्ये चॅम्पियन उझबेकिस्तानविरुद्ध बरोबरी साधण्यापूर्वी पहिले आठ सामने जिंकून चॅम्पियन संघ असल्याची ग्वाही दिली होती. २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने मायदेशात कांस्यपदक जिंकले होतं.