पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अटक केल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला आहे. तिथे जाळपोळ आणि लूटमार सुरू झाली असून तेथील भयानक दृश्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच आता पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीने केलेल्या एका ट्विटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.
कारण या अभिनेत्रीने एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये तिने दिल्ली पोलिसांना लिंक मागितली आहे आणि आपणाला भारतीय पंतप्रधान आणि रॉ विरोधात तक्रार दाखल करायची असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. पण या अभिनेत्रीला दिल्ली पोलिसांनी असं काही प्रत्युत्तर दिले आहे जे पाहून अनेकांनी दिल्ली पोलिसांचा स्वॅगच वेगळा असल्याचं म्हटलं आहे. शिवाय या पाकिस्तानी अभिनेत्रीला अनेक मजेशीर सल्ले नेटकरी देत आहेत जे वाचून अनेकांना हसू आवरणं कठीण होत आहे.
अभिनेत्री शिनवारीने काय केलं ट्विट?
सेहर शिनवारीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे, “कोणाला दिल्ली पोलिसांची ऑनलाइन लिंक माहित आहे का? माझ्या देशात पाकिस्तानमध्ये अराजकता आणि दहशतवाद पसरवणाऱ्या भारतीय पंतप्रधान आणि भारतीय गुप्तचर संस्था रॉ यांच्या विरोधात मला तक्रार दाखल करायची आहे. जर भारतीय न्यायालये स्वतंत्र असतील (त्यांच्या म्हणण्याप्रमाणे) तर मला खात्री आहे की भारताचे सर्वोच्च न्यायालय मला न्याय देईल.”
दिल्ली पोलिसांचा भन्नाट उत्तर –
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं, “पाकिस्तान आमच्या अधिकारक्षेत्रात नाही. पण, तुमच्या देशात इंटरनेट बंद असताना तुम्ही कसे ट्विट करत आहात? ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे.”
नेटकऱ्यांना भावला दिल्ली पोलिसांचा रिप्लाई –
दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी अभिनेत्रीला दिलेला रिप्लाय नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, एका ट्विटने पाकिस्तानची धुलाई झाली. तर आणखी एकाने लिहिलं, “पाकिस्तानात दिल्ली पोलिसांची शाखा अद्याप उघडलेली नाही, काही दिवस थांबा. पीओकेमध्ये शाखा सुरू होणार असेल तर तक्रार करा.” तर दुसऱ्या एका युजरने, “मॅडम, आधी फायर ब्रिगेडला फोन करा आणि तुमच्या देशातील लष्कराच्या मुख्यालयात लागलेली आग विझवा. पाणी नसेल तर ट्विट करून नक्कीच मदत होईल.” अशी कमेंट केली आहे.