पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ८ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर तिथे हिंसक आंदोलन सुरू आहे आणि या घटनेचा तिथल्या प्रसिद्ध वृत्तवाहिनेच्या वृत्तनिवेदिकेने वेगळ्या प्रकारे विरोध केला आहे. या वृत्तनिवेदिकेने आपल्या लहान मुलीला स्टुडिओमध्ये सोबत घेऊन बलात्कार प्रकरणाची बातमी वाचली.

किरण नाज असं या वृत्तनिवेदिकेचे नाव आहे. ती ‘समा टीव्ही’साठी वृत्तनिवेदन करते. बलात्कारची बातमी वाचताना किरण भावूक झाली. मी आज या वाहिनीची वृत्तनिवेदिका म्हणून नाही तर एक आई म्हणून बोलतेय म्हणूनच मी माझ्या मुलीला घेऊन वृत्तनिवेदन करणार असल्याचं किरण म्हणाली. ‘या मुलीचे आई-वडिल सौदी अरेबियामध्ये धार्मिक यात्रेसाठी गेले होते, एकीकडे ते आपल्या मुलीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते आणि दुर्दैव म्हणजे त्याच काळात या चिमुकलीवर बलात्कार झाला आणि तिला मारुन फेकून देण्यात आले.” असंही ती म्हणाली. यासोबतच तिने मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. आज एका चिमुकलीचा नाही तर माणुसकीचा गळा घोटला गेला, असं ती म्हणाली.

पाकिस्तानमधली कसूर गावात ८ वर्षांच्या मुलीवर पाशवी बलाल्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला. जोपर्यंत आरोपींना पकडून त्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत या मुलीवर अंतिम संस्कार करणार नसल्याची ठोस भूमिका तिच्या पालकांनी घेतली आहे. याप्रकरणाला देशभरातून विरोध होत असून ठिकठिकाणी  आंदोलनाला हिंसक वळण लाभलं आहे.

Story img Loader