भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते जगभरात आहेत. त्यातही खास करुन भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांचे भारताच्या कर्णधारावर विशेष प्रेम आहे. आणि हेच प्रेम नुकत्याच एका ट्विटर पोस्टवरून समोर आले आहे.

पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजादला पाकिस्तानचे काही चहाते पाकचा विराट कोहली म्हणतात. याचाच आधार घेऊन पाकिस्तानमधील एका ट्विटर अकाऊण्टने कोहली आणि अहमदची तुलना करत तुम्हाला कोण आवडतो असे नेटकरांनाच विचारले. दोघांचे बाजूबाजूला फोटो पोस्ट करुन त्याबरोबर ‘अहमद शहजाद आवडत असेल तर रिट्वीट करा आणि कोहली आवडत असेल तर ट्विट लाइक करा’ असा मजकूर पोस्ट करण्यात आला. पाकिस्तानी चाहत्यांनीही ऑफ फिल्ड जास्त चर्चेत असणाऱ्या अहमद शहजाद ऐवजी प्रतिस्पर्ध्यांना मैदानात  गारद करणाऱ्या विराटच्या पारड्यात मते टाकली. या ट्विटला ३२२ रिट्विट मिळाले म्हणजे केवळ ३२२ जणांनी अहमद शहजादला पसंती दर्शवली तर कोहलीच्या पारड्यात पडलेल्या मतांची संख्या होती ६ हजार ४५८! पाकिस्तानमध्ये इतकी लोकप्रियता असणारा कोहली हा धोनीनंतरचा सध्याचा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

या ट्विटवर केवळ मते न नोंदवता वाचाळ अहमद शहजादवर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. कोहली आणि अहमद शहजाद तुलना होऊ शकत नाही, कोहलीच सरस आहे हे आपल्या सर्व पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनाही ठाऊक आहे आणि हे मान्य करायलाच हवे अशी उत्तरे या ट्विटला पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिली. तर अहमद शहजादला चिमटे काढणारेही काही ट्विटस पाकिस्तानी ट्विपल्सने केले. ही तुलना म्हणजे कोहलीचा अपमान आहे, अहमद कोहलीच्या आजूबाजूला सुद्धा नाहीय. तो कोहली लेजन्ट आहे, कोहलीच्या बाजूला नाव लिहीण्या इतकाही अहमद शहजाद लायक नाहीय. अहमद स्वार्थी आणि निरोपयोगी क्रिकेटर असून दुसरीकडे कोहली म्हणजेच क्रिकेट अशी स्थिती आहे असे ट्विटही करण्यात आलेले आहेत.

कोहलीच्या शैलीचे आणि खेळाचे पाकिस्तानमध्ये असंख्य चहाते आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघ विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन सामन्यांदरम्यानही  “कोहली आणि धोनी तुम्ही पाकिस्तानमध्ये येऊन आमच्या संघाविरुद्ध खेळावे अशी आमची इच्छा आहे.” “कोहली, धोनी आम्ही तुम्हाला मीस करतोय.” असे असंख्य पोस्टर्स कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. भारतीय संघ ज्याप्रकारे खेळतोय आणि प्रत्येक खेळाडूची कामगिरी ज्याप्रकारे दिवसोंदिवस उंचावत आहे तशी त्यांच्या चाहत्यांची संख्या जगभरात वाढतेय याचेच हे उदाहरण आहे.

Story img Loader