माणसात माणुसकी असणे फार गरजेचे असते; अन्यथा माणूस आणि प्राण्यात काही फरक राहणार नाही. पण माणसातील माणुसकी दिवसेंदिवस कमी होतानाच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला पाहायला मिळत आहेत. लोक पैसे, मालमत्ता, तर कधी क्षुल्लक कारणासाठी आपल्याच प्रिय व्यक्तींचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. सध्या पती-पत्नीशी संबंधित अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे; ज्यात चिकन तिखट, मसालेदार न बनविल्याने रागावलेल्या पतीने पत्नीला थेट गच्चीवरून खाली फेकून दिले. ही धक्कादायक घटना पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत एक महिला छतावरून थेट जोरात खाली पडताना दिसत आहे. तिला इतकी गंभीर दुखापत होते की, ती जोरजोरात ओरडू लागते. त्यानंतर काही लोक तिच्या मदतीसाठी पुढे येतात आणि तिला उचलतात. दुखापतीमुळे ती जोरात रडू लागल्याचे दिसते. व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने दावा केला की, पत्नीने चिकण तिखट न बनविल्याने हा पाकिस्तानी माणूस संतापला आणि त्याने पत्नीला उचलून थेट घराच्या गच्चीवरून खाली फेकून दिले. परंतु, या घटनेची लोकसत्ता डॉट.कॉम पुष्टी करीत नाही.
घटनेचा धक्कादायक व्हिडीओ @ZafarHeretic नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. काहींनी ‘हे भयानक प्रकरण असल्याचे म्हणत, दोषी पतीवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.